कळसूबाई मित्रमंडळातर्फे धाडसी, प्रेरणादायी अन् राष्ट्रभक्तिमय उपक्रम
घोटी : प्रतिनिधी
देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, घोटी येथील कळसूबाई मित्रमंडळाच्या माध्यमातून अत्यंत धाडसी, प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत उपक्रम राबविण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष तथा अनुभवी गिर्यारोहक भागीरथ मराडे यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली गिर्यारोहक प्रवीण भटाटे, भागीरथ म्हसणे, काळू भोर, नीलेश पवार, संजय शर्मा, किसन बिन्नर आणि रामदास चौधरी यांनी थेट श्रीनगर गाठले.
कित्येक दशके दहशतवाद, निषेध मोर्चे, उग्र आंदोलन आणि रक्तरंजित घटनांचा साक्षीदार राहिलेल्या श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात या गिर्यारोहकांनी तिरंगा ध्वजाला सलामी दिली. राष्ट्रगीताच्या गजरात परिसर भारावून गेला. यावेळी पहेलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना, तसेच यापूर्वी दहशतवादी भ्याड हल्ल्यांत शहीद झालेल्या हजारो निष्पाप नागरिकांना व भारतीय लष्कराच्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
दहशतवाद्यांच्या भीतीमुळे अनेक दशके लाल चौकात तिरंग्याचे ध्वजवंदन होऊ शकले नव्हते. मात्र, आज तोच लाल चौक बदलत्या भारताचे प्रतीक बनला आहे. एकेकाळी हिंसाचारासाठी ओळखला जाणारा हा चौक आता स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि इतर राष्ट्रीय सणांच्या वेळी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतो. स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने या उत्सवांमध्ये सहभागी होत आहेत, हे बदलत्या काश्मीरचे सकारात्मक चित्र अधोरेखित करते. आजही स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी लाल चौकात तिरंगा फडकवणे हे राष्ट्रीय अस्मिता, अभिमान व एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी दाखवलेले धैर्य व सामाजिक भान यामुळे याचे कौतुक होत आहे.
शालेय जीवनापासून श्रीनगरच्या लाल चौकाचा रक्तरंजित इतिहास ऐकिवात होता. त्यामुळे कधीतरी याच लाल चौकात ध्वजवंदन करून ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देण्याचे स्वप्न होते. आज ते स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याने आम्हाला अपार, मनस्वी आनंद झाला आहे. हा उपक्रम केवळ एक साजरा केलेला दिवस नसून, तो राष्ट्रीय एकात्मता, शांतता आणि नवभारताच्या आत्मविश्वासाचे जिवंत प्रतीक ठरत आहे.
– भागीरथ मराडे, संस्थापक अध्यक्ष, कळसूबाई मित्रमंडळ