वाहनांची तोडफोड; भीतीचे वातावरण, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश चौक व हनुमान चौक परिसरात रविवारी रात्री अज्ञात टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. या घटनेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन चारचाकी वाहनांसह एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रविवारी (दि. 25) रात्री सुमारे 10 ते 10.30 च्या सुमारास ही घटना घडली. अचानक परिसरात दाखल झालेल्या टोळक्याने हातातील हत्यारे व दगडांच्या सहाय्याने वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. वाहनांची तोडफोड होत असल्याचा आवाज ऐकताच नागरिक घराबाहेर आले. काही नागरिकांनी टोळक्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत संबंधित टोळके घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, गणेश चौक येथील एम.एस.ई.बी.कार्यालयाच्या मागील भागात दररोज रात्री काही टवाळखोर मद्यप्राशनासाठी जमतात. या ठिकाणी नियमितपणे नशेचा अड्डा सुरू असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास शिवीगाळ करणे अथवा अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याचेही सांगण्यात आले. या परिसरात टवाळखोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. भीतीपोटी कोणीही पुढे येण्यास तयार नसते. मात्र, रविवारी झालेल्या तोडफोडीमुळे संयमाचा अंत झाला आहे.
पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. उशिरापर्यंत अज्ञात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.