जामूनपाडा शाळेची वर्गखोली कोसळली

सुदैवाने जीवितहानी टळली; प्रशासनाचा दुर्लक्षाचा मुद्दा ऐरणीवर

कळवण : प्रतिनिधी
तालुक्यातील जामूनपाडा येथील जिल्हा परिषद शाळेची एक वर्गखोली रविवारी कोसळली. सुदैवाने रविवार असल्याने शाळेला सुटी होती व विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, शाळेच्या जीर्ण अवस्थेमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेबाबत ग्रामस्थांनी सोमवार (दि. 26) सकाळी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची तत्काळ दखल घेत गटविकास अधिकारी वंदना सोनवणे व गटशिक्षण अधिकारी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकार्‍यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकार्‍यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. नवीन वर्गखोल्यांची उभारणी करण्यात येणार असून, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे वर्ग सुरक्षित पर्यायी ठिकाणी भरवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी शाळेच्या धोकादायक अवस्थेबाबत तक्रार केली होती. त्यानुसार आमदार नितीन पवार यांनी नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाच्या सूचना प्रशासनाला दिल्या. डिसेंबर महिन्यात कार्यारंभ आदेशही काढण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर जिल्हा परिषद माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी प्रशासनाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष सूचना दिल्या.

Jamunpada school classroom collapses

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *