दररोज चर्चेत येते नवी तारीख;विस्थापितांमध्ये वाढतेय धाकधूक
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
दसरा, दिवाळी, त्यानंतर निवडणूक आणि आता संत निवृत्तिनाथ महाराज यात्रा आटोपली आहे. पावसाळ्याच्या अखेरीस दसरा, दिवाळीनंतर शहरात तोडफोड सुरू होणार, रस्ते रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होणार, असे भाकीत करण्यात येत होते. त्यानंतर नगरपरिषद निवडणूक जाहीर झाली. साहजिकच निवडणुकीनंतर वरवंटा फिरणार, असा चर्चेचा
फेर धरला. किंबहुना निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा तोडफोडीच्या सभोवताली केंद्रित झाला होता. शहरात तोडफोड व विस्थापित करणारे आणि तोडफोड होऊ देणार नाही, असा दिलासा देणारे असे निवडणुकीच्या रिंगणात असणारे परस्परविरोधी प्रचार करत होते.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत आम्ही तोडफोड करणार नाही, विस्थापित होणार नाही, याची काळजी घेण्याचे ठासून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तर विस्थापित झाले तर त्यांना आम्ही योग्य तो मोबदला देणार, असेही सांगितले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला नाही, उलट काळजीत भर पडली. त्यानंतर यात्रोत्सव तोंडावर आला तेव्हा यात्रा झाली की ताबडतोब बुलडोझर दारात येणार, अशी जाणकारांची भविष्यवाणी झाली. आता यात्रा आटोपली व त्यानंतर आलेला प्रजासत्ताक दिन झाला. आता मात्र धाकधूक वाढली आहे. थांबवण्यात आलेले उपजिल्हा रुग्णालयदेखील स्थलांतरित होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.
त्र्यंबकेश्वर शहर हे धार्मिक विधीसाठी आणि त्यातही जन्मकुंडलीतील दोष निवारण करण्यासाठी प्रसिद्ध आहे. साहजिकच येथे घरोघरी ज्योतिषी आहेत. मात्र, अतिक्रमण काढणे, अवैध बेकायदेशीर बांधकामावर वरंवटा फिरवणे असे भाकीत करतानाच डीपीमध्ये नमूद केल्याप्रमाणे रस्ते रुंदीकरण होणार आणि त्यामध्ये घरादारावर बुलडोझर फिरणार, मेनरोडचा गंगा स्लॅब काढणार आणि त्यासाठी शेकडो वर्षांचे वाडे तोडणार यांसारखे भविष्य छातीठोकपणे सांगितले जाणारे जागोजागी भेटत आहेत. यात व्यावसायिक अथवा रहिवासी जागेत नव्याने काम करण्यासाठी इच्छुक असलेले मात्र संभ्रमात सापडले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथे गत वीस वर्षांत सुबत्ता आली आहे. त्यातही धार्मिक पर्यटनवाढीस लागल्याने त्यावर आधारित व्यवसायांना बरकत आली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी मोक्याच्या जागेवर बस्तान बसवलेले आता घडी विस्कटणार म्हणून काळजीत पडले आहेत. आर्थिक प्रगती साधल्याने घरादारांचे वैभव वाढले आहे. यात अनेकांच्या हातून नगरविकासच्या नियमांचे उल्लंघन कळत नकळत झाले आहे. काहींनी आतातायी भूमिकेतून, तर काहींनी अपरिहार्यता म्हणून नियमबाह्य बांधकामे करण्यास हातभार लावला आहे.
व्यवसायासाठी इमारतीत अत्यावश्यक असलेल्या वाहन पार्किंगच्या जागेचा वापर, तर सर्रास केलेला दिसतो. नियमांचे झालेले उल्लंघन आता झोप उडवणारे ठरले आहे. अफवांच्या कंड्या पिकवत मजा घेणारे त्याचा आनंद घेत आहेत. विशेष म्हणजे, शासन अधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवत सूचक हास्य करतात. त्यामुळे काळजीत अधिक भर पडते आणि छातीतील धडधड वाढत पोटात गोळा येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.
Rumors of vandalism spread to Trimbakeshwar