नगराध्यक्ष उगले यांच्या पुढाकारातून सिन्नरकरांच्या हिताचा निर्णय
सिन्नर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला सिन्नर नगरपालिकेचा पारंपरिक भोंगा आता नियमितपणे वाजणार आहे. तसेच हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण करून प्रकाशयोजना सुरू करणे, या निर्णयांमुळे शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी सहा वाजता आणि रात्री 8.30 वाजता वाजणार्या भोंग्यामुळे सिन्नरकरांच्या दैनंदिन जीवनात पुन्हा एकदा शिस्तबद्ध दिनक्रम रुजण्यास मदत होणार आहे.
सिन्नर शहरातील नागरिकांच्या भावना, परंपरा व दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देत सिन्नर नगरपरिषदेनचे नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनी लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. अनेक वर्षांपासून सिन्नर शहराची ओळख असलेली भोंगा सेवा काही काळ बंद होती. मात्र, नागरिकांकडून सातत्याने येणार्या मागण्या, सूचना आणि भावना लक्षात घेऊन नगराध्यक्ष उगले यांच्या पुढाकारातून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी अभिजीत कदम यांच्या सहकार्याने ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना वेळेत उठण्यास मदत होत असून, दुकाने वेळेत बंद करणे, घरगुती कामांची आखणी करणे यासाठी भोंगा उपयुक्त ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. भोंगा सेवा सण-उत्सव, आपत्कालीन परिस्थिती, सूचना देण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.
हुतात्मा स्मारकाला झळाळी
दरम्यान, सिन्नर नगरपालिकेजवळील हुतात्मा स्मारक येथे दीर्घकाळ बंद असलेली ज्योत व प्रकाशयोजना नगराध्यक्ष उगले यांच्या पुढाकारातून पुन्हा सुरू करण्यात आली. स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात आल्याने परिसर अधिक देखणा झाला आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून देणारे हे स्थळ आता अधिक प्रेरणादायी ठरत आहे.
लोकाभिमुख निर्णयांना प्राधान्य
भोंगा सेवा ही सिन्नर शहराची शिस्तप्रिय व उपयुक्त परंपरा आहे. हुतात्मा स्मारक हे शहराच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊनच हे निर्णय घेण्यात आले असून, पुढेही नगरपरिषद नागरिक हिताचे लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध राहील. – विठ्ठलराजे उगले, नगराध्यक्ष
The bell will now ring regularly in Sinnar.