तीन दिवस शासकीय दुखवटा
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी (दि.28) विमान दुर्घटनेत निधन झाल्याने राज्य शासनाने तीन दिवस शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. नाशिक महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालये बुधवारी बंद करण्यात आली. महापालिकेवरील तिरंगा अर्ध्यावर ठेवण्यात आला.
नाशिक महापालिकेला शासनाकडून आदेश प्राप्त होताच महापालिकेचे मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालये बंद करण्यात आली. नाशिक महापालिका मुख्यालयावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला.
प्रशासनाकडून मिळालेेल्या माहितीनुसार, शासनाच्या आदेशानुसार तिरंगा पुढील तीन दिवस अर्ध्यावरच ठेवण्यात येणार आहे. तसेच शासकीय दुखवट्याच्या काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असेे निर्देशही देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी शासकीय सुट्टी जाहीर केली. शासनाच्या निर्र्देेशानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी नाशिकमध्येही तत्काळ करण्यात आली.
मनपा गट व गटनेतेपदाची नोंदणी पुढे ढकलली
नाशिक महापालिकेची निवडणूक गेल्या महिन्यात झाल्यानंतर भाजप, शिवसेना उबाठा, काँग्रेस या पक्षांकडून बुधवारी गटनेतेपदाची नोंदणी केली जाणार होती. या पक्षांनी गटनेतेपदी नियुक्त नगरसेवकांची नावेही जाहीर केली आहेत. मात्र, अजितदादांच्या निधनामुळे या पक्षांनी गट व गटनेतेपदाची नोंदणी पुढे ढकलली आहे.