‘नाशिकचा पालकमंत्री मीच’वरून वेधले होते लक्ष
नाशिक : प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी नाशिकला लागून असलेल्या भगूर नगरपरिषद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर 2025 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा झाली. मात्र, पवार यांची ही नाशिक जिल्ह्यातील अखेरची सभा ठरेल अशी कोणीही कल्पना केली नसेल. दरम्यान, अजितदादा पवार यांचे निधन झाल्याने भगूरमधील राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी व भगूरवासीयांनी हळ्हळ व्यक्त केली.
भगूर नगरपालिकेत राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना उबाठा उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी अजितदादांनी भगूरकरिता निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे सांगतानाच नाशिकचे पालकमंत्रिपद रखडल्याने त्यावर भाष्य करत, नाशिकचा पालकमंत्री मीच राहणार असल्याचे म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच अर्थखाते माझ्याकडे असून निधी कमी पडून देणार नाही, असे सांगितले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असल्याने भगूरकरांसाठी सर्वकाही खुले करू, असे आश्वासन दिले होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे आम्ही लोक आहोत. भगूर नगरी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे. या पुण्यभूमीचा विकास गेल्या 25 वर्षांत पाहिजे तसा झाला नाही. केवळ धुरळा उडवला म्हणजे विकास होत नाही, असा टोला विरोधकांना लगावला होता. त्यांनी आ. सरोज आहिरे यांचे त्यावेळी कौतुक केले होते. बुधवारी (दि. 28) मात्र त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच भगूरमध्ये दादांच्या भाषणाची आठवण काढली
जात होती.