मालेगावला 7 फेब्रुवारीला महापौर, उपमहापौर निवड

महापौरपद इस्लाम पार्टीकडे जाण्याची शक्यता

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीची तारीख जाहीर झाली असून, येत्या 7 फेब्रुवारीला विशेष महासभेत ही प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौरपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे मालेगावकरांचे लक्ष लागले आहे.
महानगरपालिकेच्या 21 प्रभागांतून 84 नगरसेवक निवडून आले आहेत. सध्याच्या बलाबलानुसार इस्लाम पार्टी 35, समाजवादी 5, एमआयएम 21, शिंदेसेना 18, काँग्रेस 3 तर भाजप 2 नगरसेवक आहेत. मालेगाव सेक्युलर फ्रंटमधील इस्लाम पार्टी व समाजवादी पक्षाला काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे सत्तेसाठी आवश्यक असलेली 43 ची मॅजिक फिगर पूर्ण झाली आहे. त्यामुळे महापौरपद इस्लाम पार्टीकडे जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
तरीही खबरदारी म्हणून संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी इस्लाम पार्टीचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा आहे. महापौरपदासोबतच उपमहापौर आणि स्थायी समितीवरील पदांवर कोणाची निवड होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. समाजवादी पक्ष व काँग्रेसला कोणती पदे मिळणार, याकडेही लक्ष आहे.
नियमानुसार महापौर निवडीच्या तीन दिवस आधी, म्हणजे 4 फेब्रुवारीला
नामनिर्देशनपत्रे दाखल केली जाणार आहेत. त्यामुळे त्या दिवशी उमेदवारांची नावे स्पष्ट होतील. दरम्यान, सर्व पक्षांनी गटनेत्यांची निवड पूर्ण केली असून, एमआयएमने नाशिक येथील महसूल आयुक्त कार्यालयात गटनिहाय नोंदणी केली आहे. महापौर निवडीनंतर आठ ते दहा दिवसांत विशेष सभा घेऊन विविध समित्यांची रचना करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मालेगावच्या राजकारणात घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

Malegaon to elect Mayor, Deputy Mayor on February 7

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *