सप्तशृंगगड : प्रतिनिधी
साप्ताहिक सुटी तसेच सोमवारी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने सप्तशृंगगडावर लाखो भाविकांची गर्दी झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून भाविकांची रीघ सुरूच असून, दर्शनासाठी दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत असतानाही भाविकांचा उत्साह कायम होता. गर्दी सातत्याने वाढतच गेल्याने फनिक्युलर ट्रॉलीसह पार्किंग व्यवस्थेवरही मोठा ताण आला. भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या आदिमाया सप्तशृंगीदेवी दर्शनासाठी शनिवार, रविवार व प्रजासत्ताकदिनी शासकीय सुट्टी असा योग जुळून आल्याने सप्तशृंगगडावर देवीदर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली. ‘बोल आंबे माते की जय’, ‘सप्तशृंगी माता की जय’, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, अशा देवीच्या जयजयकाराने सप्तशृंगगड व परिसर दुमदुमून गेला होता.
Crowd at Saptashringgad due to consecutive holidays