मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजर्‍यात अडकली. पहाटेच मादी पिंजर्‍यात अडकली असावी, मात्र शेतकरी उशिरा शेतात आल्यामुळे हा प्रकार लक्षात आला. गेल्या तीन महिन्यांत येथे चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे.
गेल्या शुक्रवारी (दि. 23) संजय कथले यांच्या शेतातील मका पिकात या बिबट्याने चार बछड्यांना जन्म दिला. बछड्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात एक बछडा तोंडातून पडला. वनविभागाने त्याला आईसोबत पुन्हा भेटवून देण्याचे नियोजन केले होते.
बछड्यांच्या वियोगामुळे मादी हिंसक होऊ शकते, अशी शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने परिसरात दोन पिंजरे ठेवून सापळा रचला होता. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकरी संजय कथले गहू पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता, पिंजर्‍याचा खटका पाहून त्यांनी जवळ जाऊन पाहिले आणि मादी जेरबंद असल्याचे आढळले.
सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनमंडळ अधिकारी महेश वाघ, तानाजी भुजबळ, वनरक्षक ए. जे. सय्यद, आकाश रूपवते, नीलेश निकम आणि बचाव पथकाने मादी पिंजर्‍यासह मोहदरी येथील वनोद्यानात हलवली.
प्रत्यक्षदर्शी संजय कथले यांनी सांगितले की, बिबट्याच्या तोंडात चार बछडे होते. त्यापैकी एक पडला तर उरलेले तीन बछडे मादीने शेजारच्या मका पिकात ठेवले. मादी जेरबंद झाल्यानंतर वनविभाग आणि स्थानिक शेतकर्‍यांनी जवळपास दहा एकर क्षेत्रात बछड्यांचा शोध घेतला, मात्र बछडे मिळाले नाहीत. वनविभागाच्या मते, बछडे मादीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले असण्याची शक्यता आहे.

Female leopard captured in Mithasagare Shivara

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *