बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा निर्णय म्हणजे आत्मघात आहे. कारण बांगलादेश भारतात खेळला काय नि न खेळला काय, भारतावर याचा काही परिणाम होणार नाही. भारतावरच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही याचा काहीही परिणाम होणार नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात न खेळण्याचा निर्णय घेतल्यावर आयसीसीने कठोर भूमिका घेत त्यांना थेट स्पर्धेबाहेर हाकलून स्कॉटलंडला विश्वचषक खेळण्याची संधी दिली. भारतात क्रिकेट न खेळण्याची भूमिका घेऊन बांगलादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीवर दबाव टाकत होता. त्यांच्या या दबावाला आयसीसी बळी पडली नाही. उलट आयसीसीने बांगलादेशला त्यांची जागा दाखवून दिली. भारतात न खेळण्याचा निर्णय घेऊन बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. कारण या स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. या स्पर्धेतून माघार घेतल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे पाच लाख डॉलर नोंदणी शुल्क जप्त होईल. याशिवाय बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसीकडून मिळणारी मोठी रक्कमही मिळणार नाही. आधीच आर्थिक अडचणीत असलेला बांगलादेश क्रिकेट बोर्ड यामुळे आणखी अडचणीत येईल, पण बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आणि त्यांच्या देशाला भारतद्वेषाने पछाडले असल्याने त्यांना ते दिसत नाही. बांगलादेश भारतद्वेषाने किती पछाडला आहे, हेच बांगलादेशाने त्यांच्या या कृतीतून दाखवून दिले आहे. सुरक्षेच्या कारणाने या स्पर्धेतून माघार घेत आहोत, हे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे स्पष्टीकरण तर हास्यास्पदच आहे.
भारतात खेळणार्या परदेशी खेळाडूंना अतिउच्च दर्जाची सुरक्षा पुरवली जाते म्हणूनच जगातील सर्व खेळाडू भारतात खेळण्यासाठी उत्सुक असतात. भारतात खेळणार्या परदेशी खेळाडूंच्या जिवाला धोका निर्माण झाला असा एकही प्रसंग अद्याप घडला नाही. बांगलादेशचेही अनेक खेळाडू भारतात अनेकदा खेळले आहेत त्यांच्या जीविताला कधी धोका निर्माण झाला? उलट या स्पर्धेत न खेळण्याचा आपल्या बोर्डाचा निर्णय त्यांच्याच खेळाडूंना पटला नाही, पण आपल्या खेळाडूंपेक्षा बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पाकिस्तान महत्त्वाचा वाटतो. पाकिस्तानच्या नादी लागूनच बांगलादेशने हा निर्णय घेतला, हे शाळकरी मूलही सांगेल. विशेष म्हणजे, ज्या पाकिस्तानसाठी बांगलादेशने हा निर्णय घेतला त्या पाकिस्तानने आयसीसीने डोळे वटारताच आपली तलवार म्यान करून या स्पर्धेत खेळण्यास होकार दिला. पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने तर आपल्या बोर्डाला खडसावताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचीही खिल्ली उडवली, पण भारतद्वेषाची पट्टी डोळ्यावर बांधल्याने बांगलादेशला हे दिसत नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयने जितके उपकार केले तितके कोणीही केले नसतील. बांगलादेशला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश मिळावा यासाठी भारतानेच प्रयत्न केला.
भारतानेच बांगलादेशची बाजू आयसीसीमध्ये मांडली आणि त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजे उघडून दिले. बांगलादेश क्रिकेटकडे पैसे नव्हते तेव्हा बांगलादेश क्रिकेटला पैसे मिळवून द्यावेत, या उद्देशाने जगमोहन दालमिया जे त्या काळात आयसीसीचे प्रमुख होते, त्यांनी 1998 साली बांगलादेशमध्ये मिनी विश्वचषक नावाची नॉक आउट क्रिकेट स्पर्धा भरवली. त्यात सर्व देशांचा सहभाग होता. ही स्पर्धा बांगलादेशात आयोजित करण्यात आल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्ड आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. जगमोहन दालमिया यांनीच इतर देशांना बांगलादेशात खेळायला लावले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. पण बांगलादेश क्रिकेट बोर्डदेखील बांगलादेश सरकारप्रमाणे कृतघ्न निघाले. असो. बांगलादेशने घेतलेला हा निर्णय बूमरँंग ठरणार, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. भारतात न खेळण्याचा निर्णय घेऊन बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली, हे मात्र नक्की.
Bangladesh Cricket Board’s suicidal decision