नाशिक शहरात सध्या विकासकामांचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर रस्ते, उड्डाणपूल, अंडरपास, पाणीपुरवठा, मलनिस्सारण यांसह विविध पायाभूत सुविधा उभारण्याची कामे एकाच वेळी सुरू झाली आहेत. रिंगरोडसाठी भूसंपादन प्रक्रिया गतीने सुरू असून, विमानतळ विस्ताराचाही आराखडा पुढे सरकत आहे. ही सर्व कामे नाशिकचा चेहरामोहरा बदलणारी ठरणार, यात शंका नाही. मात्र, या विकासाच्या धडाक्यात सध्या शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी, विकासकामांना गती आणि वाहतूक कोंडी अति, अशी म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.
सिंहस्थासाठी अवघा सव्वा वर्षाचा कालावधी उरला असताना, कामांना उशिरा सुरुवात झाल्याने प्रशासनावर वेळेचे मोठे दडपण आहे. परिणामी, शहरातील विविध भागांत एकाच वेळी कामे सुरू करण्यात आली आहेत. याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत असून, नाशिककर अक्षरशः जाम झाले आहेत. सकाळ-सायंकाळ कार्यालयीन वेळेत प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काही ठिकाणी एकाच लेनमधून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनते.
विशेषतः त्र्यंबक रोड परिसरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. अनेक मार्गांवर कामाच्या संथगतीमुळे कोंडी वाढत असून, दिशादर्शक फलकांचा अभाव जाणवतो. नवीन चालकांचा गोंधळ उडतो, तर काही ठिकाणी अपघातांच्या घटनाही घडत आहेत. शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही अशीच परिस्थिती आहे. द्वारका सर्कल परिसरात अंडरपास उभारणीसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भविष्यातील दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असला, तरी सध्याच्या घडीला नागरिकांच्या संयमाची कसोटी लागली आहे. या भागातील वाहतूक इतर रस्त्यांवर वळवल्याने पर्यायी मार्गांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. परिणामी, संपूर्ण शहरातील वाहतूक साखळी विस्कळीत झाली आहे. शरणपूर ते जुना गंगापूर नाका या मार्गावरील ही एक लेन वाहतुकीसाठी बंद असून, एकाच लेनमधून दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
विकासकामांची गरज कोणीही नाकारत नाही. सिंहस्थासारख्या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. लाखो भाविकांच्या आगमनासाठी रस्ते रुंद आणि सुरक्षित असणे अत्यावश्यक आहे. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे सध्या सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामे टप्प्याटप्प्याने आणि समन्वयाने केली असती तर त्रास काही प्रमाणात कमी झाला असता, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
वाहतूक पोलीस आणि महापालिकेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रत्येक कामाच्या ठिकाणी स्पष्ट सूचनाफलक, पर्यायी मार्गांची पूर्वकल्पना, रात्रीच्या वेळी कामाचा वेग वाढविणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून रिअल-टाइम ट्रॅफिक अपडेट्स उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना प्रवासाचे योग्य नियोजन करता येईल.
एकीकडे अनेक रस्ते बंद असताना, दुसर्या बाजूला गॅस पाइपलाइन, अंतर्गत भुयारी योजना, सीसीटीव्हीच्या फायबर केबल इंटिग्रेशनच्या कामामुळे रस्त्यावर सातत्याने खोदकाम करण्यात येत आहे. मात्र, काम झाल्यानंतर व्यवस्थितपणे खड्डे बुजविण्यात येत नाहीत. तसेच त्या रस्त्याचे नंतर डांबरीकरणही करण्यात येत नाही. परिणामी, आजूबाजूला माती, खडी पसरूनही अपघात होत आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे, तर दुचाकीस्वारांसाठी धोका वाढला आहे. वारंवार होणार्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.
नाशिककर विकासाच्या विरोधात नाहीत, मात्र विकासासोबत सुयोग्य नियोजन आणि नागरिकांच्या सोयींचा विचार होणे अपेक्षित आहे. आज सहन केलेला त्रास भविष्यात उपयोगी पडेल, ही आशा नागरिक बाळगून आहेत. परंतु, सध्याच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशासनाने समन्वय वाढवून, कामांची गुणवत्ता राखून आणि वेळेत पूर्तता करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीने पावले
उचलली पाहिजेत.
विकास आणि दैनंदिन जीवन यांचा समतोल साधणे हीच खरी कसोटी आहे. सिंहस्थाच्या तयारीसोबतच नाशिककरांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत होईल, अशी अपेक्षा आता सर्वांच्या मनात आहे.
Development works speed up; traffic congestion is severe