कालव्यात पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
लासलगाव : वार्ताहर
देवगाव फाटा येथे विवाह समारंभासाठी नातेवाइकांकडे आलेल्या १२ वर्षीय मुलाचा कालव्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली . याबाबत अधिक माहिती अशी की , लासलगाव पोलीस स्टेशनला शनिवारी उद्धव भगवान मेहरे ( रा . वारी , ता . कोपरगाव ) यांचा मुलगा यश प्रकाश मेहरे ( वय ११ वर्षे ७ महिने ) देवगाव फाटा , राम मंदिर , मुखेड शिवार , ता . येवला या ठिकाणी लग्नासाठी आला असताना , त्यास कोणीतरी फूस लावून पळवून नेले म्हणून लासलगाव पोलीस स्टेशनला भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . नातेवाईक व पालक शोधाशोध करूनही तो कुठे आढळला नाही . अखेर १५ तासांनंतर त्याचा मृतदेह सत्यगाव ( ता . येवला ) परिसरात आढळून आला . मृतदेह येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आल्याने वरील गुन्हा येवला तालुका पोलीस स्टेशनला पुढील तपासाकामी वर्ग केला असून , अधिक तपास येवला पोलीस करीत आहेत .