स्टार्टअप्स, उद्योजकांनी सहभाग द्यावा

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने उद्योजक आणि इनोव्हेटर्स तसेच स्टार्टअप्स यांनी नाशिक शहरातील पर्यावरण, आरोग्य, शिक्षणासह विविध सामाजिक घटकांशी संबंधित सेवांमध्ये सहभाग द्यावा. जेणेकरून या उद्योगांच्या वाढीसह सामाजिक विकासालाही हातभार लागेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
नाशिक जिल्हा प्रशासन, सीएसआर बॉक्स आणि कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्हचे आयोजन ताज गेटवे हॉटेल, नाशिक येथे करण्यात आले होते. शाश्वत विकासासाठी नवकल्पना, भागीदारी व गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते. महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, डीआयजीओचे ग्लोबल डायरेक्टर जेम्स आशल, सीएसआर बॉक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भोमिक शाह यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, यापूर्वी प्रयागराज येथे झालेला सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा यामध्ये मूलभूत फरक आहे. प्रयागराज येथील कुंभमेळा हा नदीकिनारी होता. येथील कुंभमेळा हा दोन शहरांमध्ये आणि मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे येथील आव्हाने भिन्न आहेत. येथे आलेल्या भाविकांना सुलभ वातावरण आणि सेवा उपलब्ध करून देणे, यासाठी प्रशासनाचे प्राधान्य असणार आहे. अर्थात, यासाठी प्रशासनाला विविध घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यांच्या माध्यमातून पर्यावरण, नागरी सुविधा, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमस्थळ परिसरात विविध स्टार्टअप्स आणि इनोव्हेटर यांच्या उत्पादन आणि संकल्पनांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि मान्यवरांनी भेट दिली.

इनोव्हेटिव्ह हबची होणार निर्मिती

महाराष्ट्र इनोव्हेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष श्री. पाटील म्हणाले की, जिल्हा पातळीवरील अशा संकल्पनांना मूर्त रूप आणण्यासाठी आता मुंबईपर्यंत पाठपुरावा करावा लागू नये, जिल्हा पातळीवरील अडचणी त्याच पातळीवर सोडवल्या जाव्यात, अशा पद्धतीने इनोव्हेटिव्ह सेलची स्थापना केली जाईल तसेच नाशिकमध्ये लवकरच सर्व प्राथमिकता पूर्ण करून विभागीय पातळीवरील इनोव्हेटिव्ह हब स्थापन करण्यात येणार आहे.

Startups, entrepreneurs should participate

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *