व्हॉट्सअ‍ॅपचा वाढदिवस!

आजचे युग सोशल मीडियाचे आहे आणि या सोशल मीडियाच्या युगात प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये अनेक मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन आहेत. आपणही दररोज अनेक मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनचा वापर करतो. या मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. याच सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरल्या जाणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनचा आज वाढदिवस आहे. व्हॉट्सअ‍ॅप हा आज परवलीचा शब्द झाला आहे. आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये दुसरे कोणते अ‍ॅप्लिकेशन असो वा नसो, पण व्हॉट्सअ‍ॅप हमखास बघायला मिळते. 24 फेब्रुवारी 2009 रोजी जेन कॉम याने व्हॉट्सअ‍ॅप आयएनसी नावाची कंपनी स्थापन केली.
व्हॉटसअ‍ॅपचा निर्माता जेन कॉम याचा जन्म युक्रेन देशातील छोट्या गावात झाला. त्याचे वडील मजूर, तर आई गृहिणी होती. युक्रेनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यावर त्याचे वडील अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे ते छोटी-मोठी कामे करू लागले. जेन कॉम याला कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची आवड होती. त्याच्या घराजवळच एक लायब्ररी होती. तेथून तो कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची पुस्तके आणत असे व घरच्या कॉम्प्युटरवर प्रोग्रामिंग करीत असे. पुढे त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवून एका सॉफ्टवेअर कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम सुरू केले. 1997 साली याहू कंपनीने इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर या पदावर त्याची नेमणूक केली. या कंपनीत त्याने नऊ वर्षे नोकरी केली. दुसर्‍या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा स्वतःची कंपनी सुरू करावी, या विचाराने त्याने ’याहू’चा राजीनामा दिला. याहूमध्ये ब्रायन अकटन हा त्याचा सहकारी होता. त्यानेही याहूचा राजीनामा दिला.
दोघांनी मिळून स्वतःची कंपनी स्थापन करण्याचे ठरवले. त्या सुमारास अ‍ॅपल कंपनीने आयफोन बाजारात आणला होता. त्यात मेसेज पाठवण्याची सुविधा होती. त्यावरून त्यांना व्हॉट्सअ‍ॅपची कल्पना सुचली. पुढे दोघांनी त्यावर काम करण्यास सुरवात केली. या प्रयोगात त्यांना यश मिळाले का नाही, हे विचारण्यासाठी त्यांच्या मित्राने त्यांना विचारले व्हॉट्सअ‍ॅप! व्हॉट्सअ‍ॅप या शब्दाचा अर्थ होतो काय झाले? हा शब्द कानावर पडता क्षणीच त्यांनी ठरवले आपल्या कंपनीचे नाव आपण व्हॉट्सअ‍ॅप हेच ठेवायचे. 24 फेब्रुवारी 2009 रोजी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप आयएनसी नावाची कंपनी स्थापन केली. सुरवातीला व्हॉट्सअ‍ॅपला खूपच कमी प्रतिसाद मिळाला. कारण तेव्हा अँड्रॉइड मोबाइलची संख्या खूप कमी होती, पण जशी अँड्रॉइड मोबाइलची संख्या वाढत गेली तशी व्हॉट्सअ‍ॅप वापरणार्‍यांची संख्याही वाढत गेली. आज व्हॉट्सअ‍ॅप जगातील पहिल्या क्रमांकाचे अ‍ॅप्लिकेशन बनले आहे. जगातील किमान दोनशे कोटींहून अधिक लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप असतेच. व्हॉट्सअ‍ॅपवर रोज एक लाख कोटीहून अधिक मेसेज सेंड होतात.
व्हॉट्सअ‍ॅपवरून दररोज पाचशे कोटींहून अधिक फोटो, तसेच शंभर कोटींहून अधिक व्हिडीओ शेअर होतात. सुरवातीला फक्त इंग्रजीमध्ये असणारे व्हॉट्सअ‍ॅप आज 53 भाषांमध्ये आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवनवीन सुविधा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देते. व्हिडीओ कॉल, ऑडियो कॉल, स्टेटस अशा नवनवीन सुविधा व्हॉट्सअ‍ॅपकडून वापरकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. आज व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसेही पाठवता येऊ शकतात. 2014 साली फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग याने 19 बिलियन डॉलरला जेन कॉम आणि ब्रायन अकटन यांच्याकडून व्हॉट्सअ‍ॅप खरेदी केले. आज व्हॉट्सअ‍ॅपची मालकी मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे आहे. आज व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. आपली दिवसाची सुरुवात व्हॉट्सअ‍ॅपनेच होते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण जर पहिल्यांदा काय पाहत असतो तर ते व्हॉट्सअ‍ॅप! आपण झोपतानाही व्हॉट्सअ‍ॅप पाहूनच झोपतो. व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुपची सुविधा सुरू झाल्याने एकाच वेळी शेकडो लोकांना मेसेज पाठवण्याची सुविधा निर्माण झाली. व्हॉट्सअ‍ॅपवर आज कोट्यवधी ग्रुप आहेत. केवळ मित्रांचे, नातेवाइकांचेच नाही, तर शासकीय नोकरांचेही ग्रुप आहेत. शासकीय संदेश, आदेश आता व्हॉट्सअ‍ॅपवर दिले जातात. लहानांंपासून थोरांपर्यंत सर्वांच्या जीवनाच्या अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सअपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *