रडणं.. हवंच!

जगात दुसर्‍यावर हसणं सोपं,
पण दुसर्‍यांसाठी रडणं कठीण !
आपण खूपदा रडणार्‍या मुलांना,अरे तू किती रडका आहे, असं सतत चिडवत असतो, ओरडत असतो, पण आपल्याला माहीत नसतं की ती व्यक्ती, तो मुलगा, तेव्हा हट्टी का झाला असावा? प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.. तिची गरज वेगळी असते.. अनुवंश वेगळा असतो, काही मुलं हळवी असतात.. छोट्या-छोट्या प्रसंगात बावरतात, कधी घाबरतात, एकटेपणा जाणवतो मग ती रडकी होतात.. अगदी मानसशास्त्रानुसार नाही सांगता येत पण त्यामागे त्यांनी लहानपणापासून बघितलेले प्रसंग, आठवणी, खाल्लेला मार, एखादी टोचणी, विशिष्ट स्वभाव, काही व्यंग, आई-वडिलातली भांडणं, घरातल्या कटकटी, आजारपण, टेन्शन, मृत्यू अपघात किंवा यापलीकडचे काही वेगळे बघणं हे सगळं त्या रडण्यामागे नक्कीच असतं. पण जगाला काय दिसतं फक्त बाह्य रडणं… त्या मुलाचे असून त्यामागे खूप त्यामागे संघर्ष, आठवणी असतात.. जगाला फक्त आनंदित लोक का आवडतात? जगात काय दुःख कमी असतं? पण दुःख…व त्यामुळे रडताना कोणालाच नको असतं किंवा लोक त्यापासून लांब जातात.
पण अश्रू हा एक अनमोल दागिना आहे …मला बरेच जण म्हणतात, योगिनी तू हसरी, आनंदी, खेळकर आहे म्हणून आम्हा सर्वांना आवडते! पण या हसण्यामागे अनेक अश्रूं चे बांध साचलेले आहेत, रडण्याने मनुष्य मोकळा होतो, मनात असलेलं बाहेर निघतं… प्रत्येक ठिकाणी आपण आनंद व्यक्त नाही करू शकत, काही ठिकाणी दुःख असंतच मार्ग मोकळा करून देतच, काही गंभीर प्रसंगात रडू येतं,काही मिळालं नाही, लागलं, वेदना झाली, मनात सल असलं, शारीरिक मानसिक वेदना झाली तरी माणूस रडतोच, पुरुषही रडतात… तोही शेवटी माणूसच आहेत ना…. आई-वडिलांचे छत्र हरवलेले पुरुष, घरात सुख नसलेली माणसं, पैशाचा अभाव, आपला पार्टनर अकाली जाणं, यामुळे सगळेजण अश्रू ढाळतात… आश्रमात असणारे वृद्ध किंवा लहान मुलं आजही आपण पाहिले तरी तर आपले हृदय पिळवटून येते आणि रडू येतेच. ती एक प्रकारची वेदनाच असते.
फार कशाला मला माहेरची साडी हा पिक्चर आठवत नाही, पण नटसम्राट किंवा आत्ताचा क्रांतिज्योती…मराठी माध्यम बघताना किंवा एखादी सिरीयल बघताना खूप रडू येते.. अश्रू तुमचा भार हलका करतात…आपणही या दुःखात आहोत ही भावना जोडते… तुमच्या मनातलं सल, त्रास, एकटेपणा कमी करतात… दुसर्‍याला समदुखी, सहवेदना जाणवण्यास भाग पडतात…. का बर कोणी रडताना पाहून आपल्याला रडू येतं? आपल्या मुलाच्याही लग्नात मंगलाष्टक ऐकताना डोळ्यांत पाणी आलेल्या कित्येक स्त्रियांना मी ढसढसा रडताना बघितले आहे… एकप्रकारे ते साचलेलं असते… स्वतःच दुःख दुसर्‍याच्या दुःखाच्या रडण्याने हलकं होतं… कधीकधी आपल्याला आठवणीने रडू येते! शेवटी रडू यायलाच हवं! ते खूप नैसर्गिक आहे….. कधीकधी पत्र वाचतानाही रडू येतं, कुणाचं बोलणं ऐकताना, ही आपण रडतोच.
शेवटी हसणं जस गरजेच आहे तसा आपल्या दुःखाचा निचरा होण्यासाठी रडूही आवश्यक आहे… ती संवेदना आहे. तो काही कमीपणा नव्हे, ना की तुम्ही कमकुवत आहात हे दाखवण्याची क्रिया! तुम्ही तर सक्षम आहातच, असायला हवंच. पण कधीकधी मनमोकळं रडणं किंवा कोणाच्या तरी सांत्वनाने आगतिक होणे… खरंच गरजेचं असतं… तेव्हा मित्रांनो मनसोक्त रडून घ्या, हां, रडल्यानंतर डोळे पुसत, न संकोचता आपल्या अश्रूंना मुक्तपणे बाहेर येेऊ द्या! फार काही गोष्टी मनात असणं गरजेचं नाही… अश्रू ढाळल्यानंतर भावनांचा निचरा होतो म्हणून मग मनंही हलकं होतं व ते फार गरजेचं असतं…
हो ना?

Crying.. I want to!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *