मनुष्य जसा समाजप्रिय प्राणी आहे तसेच तो परिवर्तनशीलप्रिय आहे. त्याला सतत बदल हवा असतो. चेंज हवा असतो आणि नाविन्याची त्याला हौस असते. पण माझ्यासारख्या सत्तर वयावरील किंवा त्या पूर्वीच्या पिढ्या अशा नवीन बदलांना सामोर जायला तयार नसत. जुने ते सोने असं म्हणणारी आमची पिढी अन् त्यामुळे नवीन काही आले की त्याला पहिल्यांदा नावे ठेवायची, नाकं मुरडायची ही आमची सवय. आणि मग सगळ्यांनी वापरून त्याचे रिपोर्ट आल्यानंतर, ते जुने झाल्यानंतर आम्ही ती गोष्ट वापरायला तयार होणार. मग ते फ्रिज असेल, मिक्सर असेल, संगणक असेल आणि आत्ता आत्ता आलेला मोबाईल असेल. आम्ही रिक्षा करून गावात जाणार, चार दुकान फिरणार, कुठे स्वस्त मिळत आहे याची खात्री करणार आणि मग पिशव्या भरभरून सामान घेणार. स्वतःला उचलता येत नाही तरी ते ओझे घेऊन हाश हुश करत रिक्षाने घरी येणार. दमून जाणार आणि चिडचिड करणार.
याउलट आत्ताची तरुण पिढी. नवीन वस्तू बाजारात की ताबडतोब यांच्या घरात. आम्ही जुने ते सोने म्हणत बसणार आणि ही तरुण पिढी मात्र जुने जाऊ द्या मरणालागुनी असं म्हणून नावीन्याचा स्वीकार करणार त्यांना सतत अपडेट राहणे आवडतेते त्यांच्या दृष्टीने बरोबरही आहे. आज तशी आवश्यकता आहे. आता संगणकयुग आले आहे. आयटी क्षेत्राची वाढ झाली आहे. पगार भरपूर दिसतो आहे. पण आमच्या काळात स्थिर आयुष्य होतं तसं सेटल्ड लाइफ आत्ताच्या मुलांचे राहिले नाही. धकाधकीचे जीवन झाले आहे. एकत्र कुटुंबाची जागा विभक्त कुटुंबाने घेतली आहे आणि त्यातही एक किंवा दोन मुले. त्यामुळे घरातील माणसांची संख्या कमी झाली आहे. घरातील नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे… त्यामुळे त्यांना कशाला वेळच नाही. तर काही घरात मुले लांब गेल्यामुळे फक्त आजी आजोबा घरात अशी अवस्था झाली आहे. घरातून बाहेर पडायला, खरेदी करायला, हाताशी कोणी नसल्यामुळे ऑनलाइन खरेदी कल्पना आली आहे. गरज ही शोधाची जननी आहे हेच खरे.
या गरजेमधून जेम्स बेजोस यांनी 1994 मध्ये बोलेव्ह्यू- वॉशिंग्टन येथेही मेझॉन कंपनी सुरू केली. मूलत: पुस्तकांसाठी ऑनलाइन बाजारपेठ म्हणून सुरू झाली. परंतु हळूहळू तिच्या ऑफरचा विस्तार होऊन ए एवरीथिंग स्टोअर म्हणून आज ती नावारूपाला आली आहे. त्यानंतर अशा ऑनलाइन वस्तू पुरवणार्या अनेक कंपन्या उदयाला आल्या. फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्विगी, ब्लिंक इट, मिशो, मिंत्रा अशा अनेक कंपन्या ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
ऑनलाइन खरेदीची गरज जशी आहे तसेच याचे फायदेपण आज दिसून येतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे घरबसल्या वस्तूंची खरेदी करता येते. स्वतःचे आवरून, जिना उतरून, वेळ काढून बाहेर जावे लागत नाही. किराणा सामान असेल, दैनंदिन लागणार्या काही वस्तू असतील यांची मागणी करताच अल्पावधीत या वस्तू आपल्या घरी पोहोचतात. अगदी कपड्यांपासून ते शूजपर्यंत आपल्याला वस्तू घरी मागवता येतात. तुम्ही मनात आणा आणि मागणी करा. थोड्याच काळामध्ये तुम्हाला वस्तू घरबसल्या मिळते. मग ते फर्निचर असेल, गार्डनिंगचे काही सामान असेल, इलेक्ट्रॉनिक काही वस्तू असतील जे मागणार ते मिळणार याची खात्री असते.
ऑनलाइन वस्तूंचा दर्जाही चांगला असतो कारण या कंपन्या रजिस्टर्ड असतात. त्यामुळे त्यांना चांगला माल, दर्जेदार माल पुरवणे आवश्यक असते. जर त्यांच्याकडून खराब माल आला आणि ग्राहकाने तक्रार केली तर त्या कंपनीवर बॅन येण्याची त्यांना भीती असते. त्यामुळे दर्जेदार माल पुरवणे हे त्या कंपनीला बंधनकारक असते. त्यामुळेच खात्रीशीर, तसेच दर्जेदार वस्तू आपल्याला मिळतात.
घरातल्या कामामधून वेळ काढून आपल्याला बाहेर जावे लागत नाही.आपल्या वेळेची, श्रमाची अन् पैशाची ही बचत होते. काही वेळेला या कंपन्यांच्या काही स्कीम्स असतात काही काही वेळा सेल असतात, त्याचाही फायदा ग्राहकांना मिळतो. एखादी वस्तू जास्त महाग असेल किंवा अधिक रक्कम असेल तर ती रक्कम आपल्याला हप्त्याने भरण्याची ही सोय असते. तसेच एखादी वस्तू मागवल्या नंतर ती इन्स्टॉल करण्याकरता त्यांची माणसेही घरी येऊन आपल्याला मदत करतात. एखादी वस्तू आपल्याला आवडली नाही किंवा एखादा घेतलेला ड्रेस जर नीट साइजमध्ये बसला नाही तर तो परत करण्याची सोय असते किंवा पैसेही रिटर्न मिळू शकतात.
ऑनलाइन पेमेंटची सोय असते. जी पे, गुगल पे आपण वापरू शकतो. जर एखाद्याला ऑनलाइन पेमेंट जमत नसेल तर कॅश ऑन डिलिव्हरी हीपण सोय उपलब्ध असते. ऑनलाइन खरेदीमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
जी मुलं यूपीएससी, एमपीएससी किंवा पोलीस भरतीच्या परीक्षा देतात, ती मुलं आपला अभ्यास सांभाळून थोड्या वेळात,’ डिलिव्हरी बॉय ’म्हणून काम करून पैसा मिळवू शकतात. तेव्हा कमवा आणि शिका यासाठी ऑनलाइन खरेदीमुळे मिळालेला रोजगार नक्कीच फायद्याचा ठरतो.
एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा एनिवर्सरी असेल अशा वेळेला एखादा बुके, केक किंवा त्या व्यक्तीची आवडीची वस्तू आपल्याला प्रेझेंट म्हणून ऑनलाइन पाठवून त्या व्यक्तीला सरप्राइज देता येते अन् त्यामुळे कितीही व्यक्ती दूर असली तरी घर बसल्या आपण त्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी होऊ शकतो.
कोरोना काळात आपण घराबाहेर पडू शकत नव्हतो त्यावेळेला ऑनलाइन खरेदी हा पर्याय फारच उपयोगी पडला. कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवले. त्यातला हा ऑनलाईन खरेदीचा पर्याय. अशा वेळेला गरज ही शोधाची जननी आहे’, ही म्हण सार्थ ठरते. जे लोक एकटे राहतात, हाताशी कुणी नाहीये त्यांच्यासाठी तसेच वृद्धांसाठी ऑनलाइन खरेदी हा पर्याय फारच सुखावह आणि सोयीचा वाटतो.
जमाना बदल गया है, जी माँजी…
Online… the need of the hour