महसूल विभागाच्या 15 सेवा एकाच दिवशी नाशिककरांच्या दारी!

अपर तहसीलदार निकम : मार्चपासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

नाशिक : प्रतिनिधी
नागरिकांच्या महसूलविषयक तक्रारी, प्रलंबित अर्ज आणि कागदपत्रांच्या दुरुस्त्या एका ठिकाणी एकाच दिवशी सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा-1 अभियान राबविण्यात येणार आहे. अपर तहसील कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आयोजित या अभियानांतर्गत महसूल विभागातील 15 सेवा नाशिककरांना सिंगल विंडो पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती अपर तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
जिल्ह्यात मार्चमध्ये मंडळस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जागेवरच सातबारातील ई-फेरफार नोंदणी व दुरुस्ती करता येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांच्या वितरणासह महसूलसंदर्भातील अन्य सेवाही प्रदान करण्यात येतील. त्यामुळे सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांचे शासकीय कार्यालयांचे हेलपाटे वाचणार आहेत. राज्य सरकारचा पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख प्रशासनावर भर आहे. त्या अनुषंगाने मार्च ते मे अशा तीन महिन्यांच्या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
प्रत्येक मंडळस्तरावर शिबिर होणार आहे. या शिबिरातून महसुली सेवा प्रदान केल्या जातील. या सेवांमध्ये सातबारा दुरुस्तीसोबत ई-फेरफार नोंदणी, अकृषक तरतुदींसंदर्भात सुधारणा मार्गदर्शन, तसेच सनद प्राप्त न झालेल्या मिळकतधारकांना नवीन व्यवस्थेबाबत माहिती करून दिली जाईल. पारदर्शक व लोकाभिमुख महसूल प्रशासन हेच आमचे ध्येय आहे. 100 टक्के प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यावर अभियानाचा भर राहील, असेही अपर तहसीलदार निकम यांनी सांगितले. नागरिकांनी संबंधित मंडळाच्या शिबिराच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. निकम यांनी केले आहे.

अभियानाची प्रमुख उद्दिष्टे

महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी उपलब्ध करणे.
तक्रार निवारण एकाच ठिकाणी आणि तत्काळ.
डिजिटल 7/12, 8अ उतारे,

शिबिराचे वेळापत्रक असे (मंडळनिहाय)

7 मार्च- सातपूर मंडळ, 14 मार्च- देवळाली मंडळ, 10 एप्रिल- नाशिक मंडळ, 17 एप्रिल- पाथर्डी मंडळ, 8 मे- मखमलाबाद मंडळ, 15 मे- तालुकास्तरीय समारोप शिबिर. (अपर तहसील कार्यालय, नाशिक)

शिबिरांत उपलब्ध सेवा

शिबिरात फेरफार निपटारा, 7/12 दुरुस्ती, डिजिटल 7/12 व 8 अ वितरण. उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रे, एकत्रित नमुना 8, पीएम किसान व ई-स्टॅक संदर्भातील मार्गदर्शन, तसेच भूसंपादन व इतर महसूल प्रकरणांबाबत माहिती देण्यात येईल. संबंधित प्रकरणांची पडताळणी करून तत्काळ सेवा देण्यावर भर राहील.

प्रशासनाची जबाबदारी व समन्वय

अपर तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठी स्थानिक नियोजन, अर्ज स्वीकृती, कागदपत्रांची पडताळणी व सेवा वितरणाची जबाबदारी पार पाडतील. विविध विभागांत समन्वय राखून तत्काळ निर्णय घेण्यासाठी दैनंदिन आढावा घेतला जाणार आहे.

15 services of the Revenue Department at the doorsteps of Nashik residents on a single day!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *