पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय
नाशिक : प्रतिनिधी
सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार सुरू असलेल्या दहा दिवसीय वार्षिक ब्रह्मोत्सव सोहळ्यात रंग, भक्ती आणि उत्साहाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी मंदिर परिसरासह संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.सकाळच्या सत्रात रांगोळी
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कल्पकता आणि कलात्मकता खुलवली. भगवान श्री बालाजी, लक्ष्मीमाता, श्री गणेश तसेच विविध धार्मिक प्रतीकांवर आधारित आकर्षक व देखण्या रांगोळ्यांनी मंदिर परिसर रंगमय झाला होता. स्पर्धकांच्या सर्जनशीलतेचे उपस्थित ग्रामस्थांनी आणि परीक्षकांनी विशेष कौतुक केले. या उपक्रमामुळे ब्रह्मोत्सवाला सांस्कृतिक परिमाण लाभले. दुपारच्या सत्रात मंदिर परिसरातून आमराईपर्यंत भगवानांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. लेझीमच्या तालावर, ढोल-ताशांच्या गजरात आणि भजनी मंडळांच्या हरिनामाच्या घोषात संपूर्ण गोदावरी माध्यमिक विद्यालय शिंगवे आणि जनता इंग्लिश स्कूल सायखेडा येथील विद्यार्थ्यांनी लेझीम व ढोल पथकाद्वारे मिरवणुकीत विशेष रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पालखीचे पूजन करून फुलांचा वर्षाव केला व आरती अर्पण केली.हा संपूर्ण सोहळा श्री श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. तसेच धरणीधरणाचार्यजी महाराज (मुंबई, घाटकोपर), भक्तीचरणदास महाराज आणि श्रीकांताचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.आमराई येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचकोष्ठीतील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांच्या
उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. एकूणच, रंग-भक्ती आणि परंपरेचा सुंदर मिलाफ असलेल्या या ब्रह्मोत्सव सोहळ्यामुळे सायखेडा व परिसरात आध्यात्मिक ऊर्जा आणि सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ झाली आहे. पुढील काही दिवस विविध कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक विधींनी ब्रह्मोत्सव अधिकच रंगणार असून, भाविकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
A confluence of color and devotion at the Brahmotsav at Lakshmi Venkatesh Temple, Saikheda