मनमाड : अमिन शेख
मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता मोहीम म्हणजे केवळ फोटो काढण्यापुरता केलेला निव्वळ दिखावा आणि चमकोगिरी असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते गुरुकुमार निकाळे यांनी केला आहे. निकाळे यांनी एक प्रसिद्धिपत्रक व काही फोटो आणि व्हिडिओ रिलीज करत नगराध्यक्ष यांचा बालेकिल्ला असलेला हनुमाननगर हाच मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित असून, येथील गार्डनमध्ये अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
विशेषतः मनमाड शहरातील सर्वच पालिकेच्या उद्यानांची तीच अवस्था असून, सफाई कर्मचारी हे केवळ कामचुकारपणा करत आहेत. याला प्रशासकीय अधिकारीदेखील तितकेच जबाबदार असून, केवळ लाड-पागे कमिशनवर वारसाहक्काने नोकरी मिळवायची, मात्र काम शून्य अशी अवस्था आहे. हा सगळा प्रकार गंभीर असून, पालिकेच्या वतीने याकडे लक्ष दिले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निकाळे यांनी दिला आहे. मनमाड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी शहरात स्वच्छतेची मोहीम हाती घेतली, मात्र ती केवळ मोक्याच्या ठिकाणी खरी परिस्थिती जनतेच्या समोर आणली जात नाही. कोणीही बोलण्याची हिम्मत करत नाही, मात्र ही जनतेच्या डोळ्यात
धूळफेक सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही. जनतेला सत्य परिस्थिती लक्षात आणून देण्यासाठी आम्ही निषेधार्थ पत्रक काढले. काही व्हिडिओ व फोटोदेखील आम्ही दिले असल्याचे पत्रात म्हटले आहे. मुळात पालिकेच्या मालकीची उद्याने आहेत की नाही? हेच जनतेला माहिती नाही. ती आजपर्यंत जनतेसाठी वापरण्यात आलेली नाही. केवळ कागदोपत्री उद्याने आहेत, मात्र खरी परिस्थिती काही वेगळीच आहे. या उद्यानांत वाळूमाफियांनी आपले वाळूचे गोडावून बनवले आहेत. तर काही ठिकाणी कचराकुंडीचे रूप बघायला मिळते. नगराध्यक्ष योगेश पाटील व मुख्याधिकारी शेषराव चौधरी हे फोटोसेशन करून जनतेला वेड्यात काढत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सफाई कर्मचारी हे लाड-पागे समितीचे फायदे घेऊन कामाला लागतात. सफाई कर्मचार्यांनी स्वच्छता करावी, अन्यथा सफाई कामगारांचे लाभ सोडून द्यावे, असेही निकाळे यांनी म्हटले आहे.
प्रभागातील उद्यानांची दुरवस्था
निकाळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, नगराध्यक्ष योगेश पाटील ज्या हनुमाननगर प्रभागातून निवडून येतात, तिथेच स्वच्छतेचे धिंडवडे निघाले आहेत. या भागातील सार्वजनिक गार्डनची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्याला सध्या कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्या लोकप्रतिनिधीला आपल्या स्वतःच्या प्रभागातील उद्यानाची निगा राखता येत नाही, त्यांनी संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचा दावा करणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
Only a show of cleanliness in Manmad; Nationalist criticism