प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध
सिन्नर : वार्ताहर
ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या गोंदेश्वर मंदिर येथील दानकर्ता गोविंदराज यांचे शिल्प प्रथमच प्रकाशझोतात आले आहे. इतिहास अभ्यासक प्रा. जावेद शेख यांनी मंदिराच्या स्थापत्यशैलीवर संशोधन करताना या शिल्पाची ओळख पटवली आहे. या शोधामुळे गोंदेश्वर मंदिराच्या इतिहास अभ्यासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
गोंदेश्वर मंदिराच्या बांधणीसंदर्भात शिलालेख किंवा ताम्रपट स्वरूपात स्पष्ट पुरावा उपलब्ध नाही. मात्र,. श्रीचक्रधर स्वामी यांच्या ‘लीळाचरित्र’ ग्रंथात ‘गोविंद’ नावाच्या व्यक्तीने मंदिर उभारल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे गोविंदराज या दानशूर व्यक्तीने मंदिर बांधले असावे, अशी ऐतिहासिक शक्यता अभ्यासक व्यक्त करतात.
गोविंदराज नेमके कोण होते, याबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते ते धनाढ्य व्यापारी होते, तर काहींच्या मते यादव राजा मल्लगी (पहिला) यांचे पुत्र युवराज गोविंदराज यांनी हे मंदिर उभारले असावे. लेखी पुराव्याअभावी निश्चित निष्कर्ष निघाला नसला तरी मंदिरातील शिल्प ही एक महत्त्वाची साक्ष मानली जात आहे. मंदिराच्या पूर्वद्वारातून मुख्य सभामंडपात प्रवेश केल्यानंतर उत्तर-पूर्व स्तंभावरील पायथ्याच्या कोष्टकात अंजली मुद्रेत उभी असलेली मानवी आकृती दिसते. दाढी, साधे वस्त्र, मोजके अलंकार, कानातील कुंडले आणि उजव्या कानामागे अंबाडा ही या शिल्पाची वैशिष्ट्ये आहेत. शिल्पशास्त्रातील ‘मानसार’ आणि ‘शिल्पप्रकाश’ यांसारख्या ग्रंथांनुसार दानकर्त्याचे शिल्प अंजली मुद्रेत, स्तंभावर किंवा प्रवेशद्वाराजवळ आणि देवतेपेक्षा लहान आकारमानात असावे, असे नमूद आहे. सदर शिल्प या निकषांशी सुसंगत असल्याचे प्रा. शेख यांनी स्पष्ट केले. शतकानुशतके दुर्लक्षित राहिलेले हे शिल्प समोर आल्याने सिन्नरच्या ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारशाला नवी झळाळी मिळाली आहे. गोंदेश्वरासारखे भव्य शैव पंचायतन मंदिर उभारणार्या गोविंदराज यांच्या योगदानाची जाणीव यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
’गोंदेश्वर मंदिर दर्शन’चे प्रकाशन
दरम्यान, प्रा. जावेद शेख यांचे शिवचरित्र प्रकाशित झाले आहे. त्रिंगलवाडी किल्ला आणि गोंदेश्वर मंदिरावर त्यांचे संशोधन सुरू आहे. ‘गोंदेश्वर मंदिर दर्शन’ हे त्यांचे पुस्तक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये मंदिराशी संबंधित धार्मिक, ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण माहितीचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला आहे.
Sculpture of the donor of Gondeshwar temple in the spotlight