अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच
विंचूर : संदीप शिरसाठ
विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले गाव आहे. मात्र, अलीकडच्या काळात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी विंचूरला बदनाम केले आहे. परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय होऊ
पाहत आहे.
पूर्वी गाव दुष्काळी होते. मात्र, पालखेड डावा कालवा येथून गेल्याने येथे बागायती शेतीत वाढ झाली. तसेच नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गामुळे छोटे-मोठे व्यवसाय धीम्या गतीने सुरू होते. त्यातच औद्योगिक वसाहतही सुरू झाली. मात्र, विंचूरच्या विकासाला खरी गती मिळाली ती लासलगाव बाजारचे उपबाजार आवार येथे सुरू झाल्यानंतरच. उद्योग-व्यवसायाबरोबरच तरुणांना व महिलांना काहीसा रोजगार उपलब्ध झाला, तरीही बेरोजगारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. विकासाबरोबरच येथे गुन्हेगारीमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मुरूम, रेती, रेशनचे धान्य, गुटखा, मटका, गांजा आदी अवैध व्यवसाय सुरू होतेच. मात्र, अलीकडच्या काळात येथे घडत असलेल्या मोठमोठ्या गुन्ह्यांमुळे ऐतिहासिक विंचूरची ओळख आता गुन्हेगारांचे शहर म्हणून होऊ पाहत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी येथे बनावट नोटा बनविणार्या टोळीचा पर्दाफाश केला. काही चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया विंचूर शाखेचे एटीएम फोडून तीस लाखांची रोकड लंपास केली.
दोन वर्षांपूर्वी एक हार्डवेअर दुकान फोडून साडेसात लाखांची रोकड लंपास झाली. तसेच येथील तीन पाटीवर एका कांदा व्यापार्याची दीड ते दोन लाखांची रोकड हिसकावून चोरटे पसार झाले, तर एका व्यापार्याला भरचौकात चाकूने भोसकल्याची घटना घडली. तसेच दारूच्या नशेत दोन मित्रांनी तिसर्या मित्राचा खून केला. मध्यंतरी एमडी ड्रग्जची विक्री करणार्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. काही दिवसांपूर्वी विदेशी मद्य बनविण्याचा व्यवसाय करणारी टोळी पकडण्यात आली.
जिल्हा परिषद मराठी शाळा विकण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. मोक्याच्या ठिकाणी विंचूर जिल्हा परिषद मराठी शाळेची जागा ही गावठाण हद्दीत येते. या जागेचे सिटी सर्व्हे व सातबारा उतारा असे दोन उतारे निघतात. सिटी सर्व्हेला शाळेची नोंद आहे, तर सातबारा उतार्यावर खरीप हंगाम 2025-26 मध्ये महसूलच्या कृपेने सोयाबीनचा पीकपेरा लावण्यात आलेला आहे. शासकीय त्रुटीचा गैरफायदा घेऊन भूमाफीयांनी शाळाच विकून टाकली.
अशा एक ना अनेक गुन्ह्यांमुळे शांत, संयमी, विंचूरचे वातावरण दूषित होऊन गावाचे नाव बदनाम होत आहे. काही बेरोजगार तरुण शॉर्टकट मार्गाने पैसा कमविण्याच्या नादात गुन्हेगारीकडे वळू लागले. व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांचे भवितव्य बर्बाद होत आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी राजकीय नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये व पोलीस प्रशासनानेही राजकीय दबावाला बळी न पडता वाढत्या गुन्हेगारीला
आळा घालावा, अशी मागणी आहे.
तरुणाईला रोजगार उपलब्ध होणे गरजेचे
विंचूर औद्योगिक वसाहत गावापासून दूर एकांतात असल्याने गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. वसाहतही पूर्वी वाइन झोन म्हणून आरक्षित केली होती. यामध्ये सुरू असलेल्या अनेक वायनर्यांना कच्चा माल व बाजारपेठेअभावी घर घर लागलेली आहे. वायनरीचे भविष्य ओळखून मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने वाइन झोनचे रूपांतर फूड झोनमध्ये झाले. मात्र, एखाद-दुसरा प्रकल्प वगळता येथे फार मोठे प्रकल्प येऊ शकले नाहीत. मंत्री भुजबळ यांनी औद्योगिक वसाहतीत एकूण किती भूखंड आहेत, यापैकी किती भूखंडांचे वितरण झाले आहे, किती भूखंडांवर उद्योग सुरू आहेत व किती भूखंड सध्या शिल्लक आहेत, याची माहिती घ्यावी व उर्वरित भूखंडांवर एखादा मोठा प्रकल्प आणावा. जेणेकरून तरुणांना रोजगार उपलब्ध होईल व परिणामी गुन्हेगारीचे उच्चाटन होईल.