सटाणा नगरपरिषद सभा; श्री देवमामलेदार नगरपरिषद नामांतराचा प्रस्ताव मंजूर
सटाणा : तालुका प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेच्या श्री देवमामलेदार नगरपरिषद अशा स्वरूपात सटाणा पालिका सभागृहात आयोजित सभेत नामांतरासह तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढवून ब करणे, श्री देवमामलेदार स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ ढासळून पडलेल्या प्रसाधनगृह हटवण्यास व स्मारकाच्या बाहेरून सुरक्षित आणि सुशोभित प्रदक्षिणा मार्ग करणे आदी प्रस्तावांना मान्यता देण्यात आली, अशी माहिती नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी दिली. नगरपरिषदेच्या इतिहासातील सर्वांत जास्त विषयांची व सर्वांत जास्त वेळ चाललेल्या या सभेस उपनगराध्यक्ष सुमित वाघ, मुख्याधिकारी ज्योती भारती, सुरेशराव भगत-पाटील यांच्यासह सर्व गटनेते, सर्व सभापती, नगरसेवक, सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
सभेत एकूण 111 विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात यात्रा पटांगणाची मोजणी व अतिक्रमण काढून पूर्व व पश्चिम या दोन्ही बाजूस 12 मीटर रुंदीचे पक्के रस्ते व पावसाच्या पाण्यासाठी भूमिगत व्यवस्था व अनुषंगिक कामांचे शासनास प्रस्ताव पाठविणे, भूजलसाठा वाढण्यासाठी लोकसहभागातून अक्षगंगा तथा आरम नदी स्वच्छता व नांगरणी करणे, सटाणा शहरात भूमिगत गटार योजना राबवून मलजल व्यवस्थापन करून ते सांडपाणी नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करून त्या पाण्यावर ग्रीन झोनचा विकास करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविणे, जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शाळा व चिकित्सालय नगरपरिषदेकडे वर्ग करण्याचा प्रस्तावही शासनास पाठविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच शहरास बाह्य वळण रस्ता होण्यासाठी प्रस्ताव पाठविणे, संपूर्ण सटाणा शहरात सीसीटीव्ही बसवून त्याचे नियंत्रण पोलीस यंत्रणेकडे देण्यासाठी प्रस्ताव पाठविणे, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता महाराष्ट्र शासनाकडून वाढीव पद मंजूर करून घेण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविणे. सटाणा शहरात भव्य शिवसृष्टी तयार करणे, राजमाता जिजाऊ उद्यानात रणगाड्याजवळ कॅप्टन अनिल पवार व बागलाण तालुक्यातील सर्व हुतात्म्यांंच्या स्मरणार्थ वॉर मेमोरील उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविणे, सौरऊर्जा विद्युत निर्मिती प्रकल्प उभारणे, युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता तालुकास्तरीय इनडोअर व आउटडोअर स्टेडियमसह स्वीमिंग पूल तयार करणे, स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने अभ्यासिका तयार करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यास मान्यता, उघड्यावर मांस विक्री बंद करण्यासाठी सटाणा शहरात विविध ठिकाणी बंदिस्त खासगी पशुवधगृह सुरू करण्यासाठी तथा उभारणीसाठी नागरिकांकडून प्रस्ताव मागविणे.
प्रभाग क्रमांक एकमधील 27 गुंठ्यांच्या मनोरंजनात्मक खुल्या भूखंडामध्ये नमो उद्यानासाठी मान्यता. वाहतूक सुरक्षा, धुळीचे प्रदूषण, नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी या रस्त्यावरून जाणारी अवजड वाहतूक सटाणा नगरपरिषद क्षेत्राच्या लांबीत दिवसा बंद करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यास मान्यता. सटाणा ते नामपूर रस्त्यालगत एकाच बाजूस आस्थापित केलेल्या 100 पथदीपांच्या खांबांपैकी 50 खांब काढून त्याच रस्त्याच्या दुसर्या बाजूस आस्थापित करण्यास मान्यता. डिजिटल ई-लायब्ररी सुरू करण्यास मान्यता. शहराचा वाढता विस्तार व वाहतूक व्यवस्था आणि अंत्ययात्रा मार्ग लक्षात घेता साप्ताहिक व दैनिक बाजार यात्रा पटांगणात भरविण्यास आणि दुसरा दैनिक बाजार सर्व्हे नंबर 123 मध्ये व बँकेच्या समोर स्व. जगन्नाथ शिवबा सोनवणे व्यापारी संकुलाजवळ भरविण्यास मान्यता, मात्र याव्यतिरिक्त कुठेही रस्त्यावर बाजार भरण्यास संपूर्णतः बंदी यांसह 111 विषयांवर चर्चा झाली, बहुतांश विषय शासन मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे ठरले.
For the first time, the most diverse topics were discussed and agreed upon