साधुग्राम ः जलवाहिन्यांचा विस्तार लांबणीवर

अडीचशे कोटींचा खर्च; पाणीपुरवठ्याला लेआउटची प्रतीक्षा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 29 ठिकाणी रस्तेकामे सुरू आहेत. मात्र, सिंहस्थाचे मुख्य अंग असलेल्या साधुग्राममध्ये साधू-महंतांसह भाविकांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासन तब्बल हजार एकरमध्ये जलवाहिन्यांचा विस्तार सिंहस्थापूर्वी करणार आहे. मात्र, साधुग्रामसह परिसरातील जमीन अधिग्रहणाच्या हालचाली बंद असल्याने प्रस्तावित अडीचशे कोटी रुपयांच्या जलवाहिन्यांचे काम लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रस्तावित जलवाहिन्यांच्या कामास दिरंगाई झाल्यास याचा फटका सिंहस्थात दाखल झालेल्या साधुग्राममधील साधू-महंतांना बसण्याची शक्यता आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मुकणे येथून थेट साधुग्राममध्ये गुरुत्ववाहिनीद्वारे जलवाहिनी आणली जाणार आहे. सदर कामाला सुरुवातही झाली आहे. मुकणेचे पाणी साधुग्रामपर्यंत आणल्यानंतर हजार एकरमध्ये विस्तारलेल्या आखाड्यातील साधू-महंतांसाठी जलवाहिन्यांचा विस्तार केला जाणार आहे. हजार एकरमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दोन ठिकाणी वीस लाख लिटरचे जलकुंभ उभारले जाणार आहे. साधारणतः या कामासाठी पंधरा महिन्यांचा अवधी लागणार आहे. सदर कामासाठी एका एकरसाठी पंचवीस लाख रुपये खर्च अपेक्षित असून, एक हजार एकरसाठी अडीचशे कोटी खर्च अपेक्षित आहे. आगामी सिंहस्थासाठी हजार एकर जागेचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया बाकी आहे. सिंहस्थात सदर भागात चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन अडीचशे कोटी खर्चून जलवाहिन्यांचा विस्तार करणार आहे. महापालिका साधुग्राममधील जागेचे भूसंपादन करणार असून, नांदूर परिसरातील आठशे एकर जमिनीचे अधिग्रहण करण्याचे नियोजन असून, सिंहस्थ काळात या जागेवर विविध आखाड्यांतील साधू-महंत वास्तव्यास असतील. त्यावेळी तेथे रस्ते, स्वच्छता, पथदीप याबरोबरच चोवीस तास पाणीपुरवठ्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. सिंहस्थात चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. मात्र, बांधकामकडून त्यांना लेआउटची प्रतीक्षा आहे. मनपाच्या बांधकाम विभागाने लेआउट देताच पाणीपुरवठा विभाग डीपीआर तयार करून तांत्रिक मंजुरीकरिता महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाकडे पाठवला जाणार आहे.

बांधकाम विभागाकडून जोपर्यंत लेआउट मिळत नाहीत, तोपर्यंत साधुग्राममधील प्रस्तावित हजार एकर जागेत पुढील प्रक्रिया करता येणार नाही. सिंहस्थात साधुग्रामसह जेथे साधू-महंतांची व्यवस्था असेल, तेथे चोवीस तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. बांधकामने लेआउट केल्यावर आमच्याकडून डिझाइनचे काम केले जाईल.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, मनपा

दीडशे व्यासाची लाइन

साधुग्रामच्या साडेतीनशे एकर जागेसह नव्याने अधिग्रहित केल्या जाणार्‍या परिसरात दीडशे मिमी व्यासाची लाइन टाकली जाणार आहे. नियोजनात बदल झाल्यास जलवाहिन्यांच्या व्यासाची क्षमता वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Sadhugram: Expansion of water channels delayed

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *