नाशिक : प्रतिनिधी
विश्व मराठी संमेलनानिमित्त होत असलेल्या विविध कार्यक्रम, परिसंवाद, काव्यवाचन यांसारख्या साहित्यिक उपक्रमांबरोबरच ग्रंथप्रदर्शन हादेखील महत्त्वाचा उपक्रम आहे. या संमेलनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात भव्यदिव्य असे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला हजारो ग्रंथप्रेमी भेट देत असून, ग्रंथ खरेदी करीत आहेत. विशेष म्हणजे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्फत दरमहा प्रकाशित करण्यात येत असलेल्या व महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या ’लोकराज्य’ मासिकासह विविध विभागांची दालने नागरिकांना माहिती देण्यासाठी सज्ज झाली आहेत. एकूण 33 विषयांवरील दालने या प्रांगणात सजली आहेत.
या दालनांच्या माध्यमातून राज्याचा इतिहास, भाषा, संस्कृती, साहित्य, विज्ञान, कृषी, सामाजिक विकास, कौशल्यविकास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी, संशोधक, विद्यार्थी व पर्यटकांनी या दालनांना अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या संमेलनस्थळी उभारण्यात आलेल्या प्रमुख दालनांमध्ये ऐतिहासिक वारसास्थळे, पुराभिलेखागारातील मराठी, मुद्रण-प्रकाशन, ग्रंथालय विश्व, संवादमाध्यमे, संस्थात्मक सहाय्य, संस्कृती, दादासाहेब फाळके चित्रनगरी, महासंस्कृती, हिरकणी, खाद्यसंस्कृती, हस्तकला, बोलीभाषा, पर्यटन, कृषी, पशुसंवर्धन व कृषीपूरक उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान व मूलभूत विज्ञान, वस्त्रोेद्योग, तंत्रशिक्षण, तंत्रज्ञान व मराठी भाषा, आदिवासी विकास विभाग, कौशल्य ते करिअर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय या दालनांचा समावेश आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयार्फत प्रकाशित केले जाणारे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र, महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार असलेल्या लोकराज्य मासिकाचे दालन जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यामार्फत संमेलनस्थळी उभारण्यात आले आहे. लोकराज्यचे 1964 पासूनचे दुर्मिळ, विशेष अंक ठेवण्यात आले आहेत. वाचकांना हे अंक पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
ग्रंथ प्रदर्शनाचा उद्देश
विश्व मराठी संमेलन हे मराठी अस्मिता, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधणारा व्यापक सांस्कृतिक उपक्रम आहे. गोदाकाठची ही नगरी आता अध्यात्म, साहित्य आणि आधुनिक विचारांच्या त्रिवेणी संगमातून जागतिक पटलावर ठसा उमटविण्यास सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक संधीचा उपयोग करून मराठीची पताका अधिक उंचावणे, हीच काळाची आणि समाजाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मराठी भाषेतील विविध विषयांवरील ग्रंथांच्या प्रदर्शनाला वाचकांनी भेट देऊन त्यांना ग्रंथ खरेदी करता यावेत, असा ग्रंथ प्रदर्शनामधील उद्देश आहे.
A procession colored the celebrations of the World Marathi Conference.