जगातील अनेक युद्धे थांबविल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आजही कायम आहे. आपणच संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका बजावली, मग या संघटनेची गरज काय? असा सवाल करत त्यांनी नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तो पुरस्कार त्यांना मिळाला नाही. त्यानंतरही युद्धे थांबविल्याचा दावा ते करीत आहेतच. भारत-पाकिस्तानसह आठ युद्धे थांबविल्याचे ते सांगतात. अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर (स्टेट ऑफ युनियन) त्यांनी नुकतेच भाषण केले. या भाषणात त्यांनी भारत-पाकिस्तानसह अनेक युद्धेे थांबविल्याचा पुन्हा एकदा दावा केला. मुळात भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारलेच नव्हते. पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 25 पर्यटकांचा जीव गेला. याशिवाय पर्यटकांची सेवा करणारा एक स्थानिक नागरिकही मरण पावला. या हल्ल्याला उत्तर म्हणून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ मे 2025 मध्ये सुरू केले होते. याच ऑपरेशन सिंदूरला ट्रम्प युद्ध समजत होते आणि आहेत. ते केवळ पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांच्या सांगण्यावरून. त्यांच्याच सांगण्यावरून ट्रम्प यांनी केलेल्या भाषणात भारत-पाकिस्तान युद्धाचा उल्लेेख केला, याविषयी शंका नाही. मी नसतो तर पाकिस्तान आणि भारत यांच्यात अणुयुद्ध झाले असते, असा दावा त्यांनी केला. तसेच ‘मी हस्तक्षेप केला नसता तर या युद्धात पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते,’ असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचले ते आपल्यामुळेच, असाही त्यांचा दावा आहे. ट्रम्प यांचे दावे अतिशयोक्तीचे आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये केवळ दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले होते. अणुबॉम्बचा वापर भारताने केला असता काय? तर नाही. पण ट्रम्प यांनी यात जे काही सांगितले ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा हवाला देऊनच. येथे दोघांवरही विश्वास ठेवता येणार नाही. भारत-पाकिस्तान युद्ध म्हणजेच ऑपरेशन सिंदूर थांबविल्याचे ट्रम्प यांनी अनेकदा सांगितले आहे. ते जेव्हा पहिल्यांदा तसे बोलले तेव्हा संसदेत हा प्रश्न उपस्थित करून संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. कोणाच्याही सांगण्यावरून ऑपरेशन सिंदूर थांबविलेले नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी निक्षून सांगितले होते. यानंतरही भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा उल्लेख ट्रम्प वारंवार करत आले आहेत. युद्ध थांबवल्याची फुशारकी मारत आहेत. त्यांची फुशारकी इकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणणारी आहे. व्यापार करारात ट्रम्प यांच्यासमोर मोदींनी आत्मसमर्पण केल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यात ट्रम्प यांच्या सांगण्यावरून ऑपरेशन सिंदूर थांंबविण्यात आले काय? याविषयी विरोधकांना शंका आहेच. ऑपरेशन सिंदूरला सर्व विरोधकांनी पाठिंबा दिला होता. मग ते ट्रम्प यांच्या सांगण्यावरून थांबविण्यात आले काय? याविषयी विरोधक शंका घेऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील, याचा नेम नसला, तरी त्यांना स्वत:ला शांतिदूत म्हणून मिरवून घ्यायचे असल्याने ते आठ-दहा युद्धे नव्हे, तर आणखी न झालेली युद्धेही थांबविल्याचा दावा करतील. पण आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल, याचा ते विचारच करीत नाहीत. भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा करताना त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांचा हवाला दिला, पण भारतावर काय परिणाम होईल, याचा अजिबात विचार केला नाही. मुळात भारताने युद्ध पुकारलेच नव्हते, हेच लक्षात घेण्यास ते तयार नाहीत. त्यांचा विश्वास शरीफ यांच्यावर असेल, तर भारतीय लोक ट्रम्प यांच्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाहीत. युद्ध रोखल्यामुळे जवळपास साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचले आहेत, अशी माहिती मला पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांनी दिली. या युद्धात शरीफ यांचाही मृत्यू होऊ शकला असता, अशीही मांडणी त्यांनी भाषणात केली. शरीफ आणि ट्रम्प यांच्यावर कोण विश्वास ठेवेल? इस्रायल-हमास, इस्रायल-इराण, इजिप्त-इथियोपिया, भारत-पाकिस्तान, सर्बिया-कोसोव्हो, रवांडा-काँगो, आर्मेनिया-अझरबैजान, कंबोडिया-थायलंड ही युद्धे माझ्यामुळे थांबली असून, जागतिक शांततेला मी मोठाच हातभार लावला आहे, असे ट्रम्प भाषणात म्हणाले. त्यांच्या दाव्याला काहीही आधार नाही. हवेत गोळीबार करून ट्रम्प यांनी केवळ श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. एकच खोटी गोष्ट वारंवार सांगितली की, लोकांना ती खरी वाटते, हा एक समज असतो. तोच अधोरेखित करून युद्ध थांबविल्याची टिमकी ते वाजवत आहेत; परंतु ऑपरेशन सिंदूर भारताने कोणाच्याही सांगण्यावरून थांबविलेले नसल्लयाचे पुन्हा एकदा भारताने ठणकावून सांगितले पाहिजे. भारत-पाकिस्तान संघर्षात अमेरिकेने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे. ट्रम्प यापेक्षा वेगळे काही करीत नाहीत. भारत-पाकिस्तान युद्ध झालेच नाही. न झालेले युद्ध थांबविल्याचा त्यांचा दावा बिनबुडाचा आहे. त्यामुळे गैरसमज पसरत आहेत. आपली शेखी मिरविण्यासाठी ट्रम्प वारंवार न झालेल्या युद्धाचा उल्लेख करत आहेत.
Stop the war, they say.