जग जळतेय; संयुक्त राष्ट्रसंघ कुठे?

आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जागतिक परिस्थितीत आंतरराष्ट्रीय शांततेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होत आहे. अशा वेळी जागतिक सहकार्याची पायाभरणी करणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मूलभूत तत्त्वांचा आणि उद्दिष्टांचा अभ्यास करणे अधिकच आवश्यक ठरते. वस्तुतः कोणत्याही संस्थेचा अथवा संघटनेचा अभ्यास करत असताना त्या संस्थेच्या सनदेची घटना अथवा उद्देशपत्रिका अभ्यासणे अनिवार्य ठरते. संयुक्त राष्ट्राचे उद्देश व तत्त्वांंचे विश्लेषण प्रस्तावनेतच प्रतिबिंब दिसते.
संयुक्त राष्ट्र संघटना असे नामकरण असलेली आंतरराष्ट्रीय संघटना वर्तमान काळात संयुक्त राष्ट्र या शब्दप्रयोगाने प्रचलित आहे. या संघटनेच्या उद्देशपत्रिकेची सुरुवात ही लक्षवेधी ठरते. आम्ही संयुक्त राष्ट्रांचे लोक येणार्‍या पिढीला युद्धाच्या विनाशापासून वाचविण्याचा दृढसंकल्प करत आहोत. युद्धाच्या या भीषण महाविनाशाने दोन वेळा मानवाला अनेक कष्ट दिले आहेत. आम्ही स्त्री-पुरुष आणि छोट्या-मोठ्या राष्ट्राला समान अधिकाराबाबतच्या विश्वासात नव्याने स्पष्ट करत आहोत की, ज्या अंतर्गत संस्था आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्याप्रति सर्वांना न्याय व सन्मान यांचा आदर उत्पन्न होईल. आम्ही सामाजिक प्रगती आणि स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करून समाजात व्यक्तीचे उच्च जीवनस्तर बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आम्ही सहनशीलतेच्या भावनेबरोबरच सर्वांच्या सोबत एका चांगल्या शेजार्‍याप्रमाणे शांततेच्या व सहिष्णु वातावरणात राहू. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता, सुव्यवस्था आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी आम्ही आपल्या सर्व शक्ती एकत्र करून असे निश्चित करत आहोत, की, समान हिताच्या व सामूहिक संरक्षणाचा अपवाद वगळता सशस्त्र सेनांचा उपयोग करणार नाहीत. आम्ही आपल्या सर्व लोकांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी अधिक दृढनिश्चयी करत आहोत. त्या अनुषंगाने सॅन फ्रान्सिस्को शहरात जमलेल्या आमच्या प्रतिनिधींनी, आपल्या संबंधित सरकारांच्या योग्य आणि संपूर्ण अधिकारांच्या आधारे, या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेला मान्यता देऊन, संयुक्त राष्ट्रसंघ या नावाने एक आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन केली आहे. जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या विनाशातून वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता सहकार्य स्थापन करण्यासाठी विविध राष्ट्रांच्या सहकार्य व समन्वयातून आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी मानवाधिकारांचे संरक्षण,
निःशस्त्रीकरण, नव आर्थिक व्यवस्था स्थापन करणे यांसारख्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी द्वितीय महायुद्धाच्या विध्वंसक पाश्वर्र्भूमीवर 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ- यूएन अस्तित्वात आला.
मानवतेसाठी कार्य करण्याची भूमिका यूएनची सतत राहली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून दुष्काळ निवारण फंड, निर्वसाहतीकरणाबाबत कार्य, तसेच कांगो, पूर्व तिमोर, कोसोवो यांसारख्या राष्ट्रांमध्ये यशस्वी शांतीसैनिक मोहिमा, कंबोडिया, मोझांबिक, ग्वाटेमालासारख्या देशांमधील नागरी संघर्ष सोडवण्यास यूएनने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. शीतयुद्धकालीन परिस्थितीत अण्वस्त्र चाचणीबंदी करार, खाडी युद्धाबाबत यूएनची भूमिका मध्यवर्ती राहली आहे. मानवी हक्क व पर्यावरणाबाबत विविध करार आजही महत्त्वपूर्ण आहे, परंतु बदलत्या परिस्थितीत आज 80 वर्षांनंतर या संघटनेच्या उद्दिष्टांचा वास्तवाशी ताळमेळ साधताना अनेक प्रश्न निर्माण होताना दिसतात. संयुक्त राष्ट्रसंघाचे आदर्श कितपत प्रत्यक्षात उतरले आहेत? जागतिक न्याय, समानता आणि शांततेच्या दिशेने किती प्रगती झाली आहे? मानवी प्रश्न व गरजांची पूर्तता झाली का? राष्ट्रांची वर्चस्व व विस्तारवादी वृत्ती, संघर्ष याचे समीक्षात्मक विश्लेषण करणे अत्यावश्यक ठरते.
उद्देशपत्रिकेची मूलभूत तत्त्वे
संयुक्त राष्ट्रसंघाच्या उद्दिष्टपत्रात काही प्रमुख मूल्ये मांडली आहेत. त्या मूल्यांच्या आधारे ही संस्था कार्य करणे अपेक्षित आहे. 1) शांततेचे संरक्षण, 2) मानवी हक्कांचा सन्मान, 3) न्याय व आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन, 4) आर्थिक व सामाजिक प्रगती, 5) स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही, बंधुता मूल्यांचा प्रसार. पण आजच्या वास्तवात या तत्त्वांची अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरली, हे मानवी समूहासमोरील न उलगडलेलं कोडं आहे.
आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखणे, राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंध वृद्धिंगत करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि विकासासाठी सहकार्य निर्माण करणे, ही त्याची मूलभूत उद्दिष्टे होती. या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी संघाने विविध अंगांची रचना केली. त्यांपैकी सर्वांत प्रभावी अंग म्हणजे सुरक्षा परिषद. सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय शांततेस धोका निर्माण झाल्यास ठोस पावले उचलण्याचा अधिकार आहे; परंतु त्याचबरोबर पाच स्थायी सदस्यांना दिलेला व्हेटो अधिकार ही त्याची सर्वांत मोठी मर्यादा ठरते. जणू या राष्ट्रांना सर्व जगातील राष्ट्रांवर नियंत्रण ठेवण्याचा परवाना दिला आहे, असे वर्तन या राष्ट्रांचे आहे. सुरक्षा परिषदेची असमान रचना व महासत्तांचा राजकीय प्रभाव, संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा परिषद हे जागतिक शांततेचे मुख्य व्यासपीठ मानली जाते. सुरक्षा परिषद ही यूएनची सर्वांत प्रभावी संस्था असून, त्यामध्ये पंधरा सदस्य आहेत. त्यांपैकी पाच स्थायी सदस्य म्हणजे अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडे व्हेटो अधिकार आहे. म्हणजेच कोणत्याही प्रस्तावावर या देशांपैकी एकाने नकार दिला तर तो प्रस्ताव अमान्य ठरतो. सध्याची रचना आजच्या बहुध्रुवीय जगात अत्यंत असमान आणि कालबाह्य असल्याची टीका केली जाते. केवळ पाच स्थायी मोजक्या राष्ट्रांकडे व्हेटो अधिकार असल्यामुळे निर्णयप्रक्रिया काही महासत्तांच्या हातात केंद्रित झाली आहे. यामुळे अनेक वेळा जागतिक हितापेक्षा राजकीय स्वार्थांना प्राधान्य मिळते. पूर्वी अमेरिकेने इस्रायलविरुद्धच्या अनेक ठरावांवर व्हेटो वापरला. अभियान सुरू करताना यूएनला विश्वासात घेतले नाही. रशियाने युक्रेनवरील कारवाईसंदर्भात अनेक ठराव रोखले. चीनने तिबेट व तैवान प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघाचा हस्तक्षेप होऊ दिला नाही.
यावरून स्पष्ट होते की, सुरक्षा परिषदेतील व्हेटो अधिकार आंतरराष्ट्रीय न्याय व समतेच्या तत्त्वांंना बाधा आणतो. त्यामुळे संयुक्ते राष्ट्रे शांतता प्रस्थापित करण्यात असमर्थ ठरते. व्हेटो अधिकार हा द्वितीय महायुद्धातील शक्ती-संतुलनावर आधारित होता,; पण आजचा भू-राजकीय परिदृश्य पूर्णपणे बदलला आहे. बहुध्रुवीय जगात अशा काही देशांना कायमस्वरूपी विशेष अधिकार देणे लोकशाही तत्त्वांच्या विरोधात आहे. आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका या खंडांचे प्रतिनिधित्व अत्यल्प असल्यामुळे जागतिक शक्तिसंतुलन वास्तवात परावर्तित होत नाही. भारत, ब्राझील, जपान आणि जर्मनी यांसारखे प्रभावशाली आणि जबाबदार देश आजही कायम सदस्यत्वापासून वंचित आहेत. जगातील लोकांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणार्‍या या संस्थेवर पाश्चिमात्य वर्चस्वाचा ठसा उमटतो. संयुक्त राष्ट्रसंघाची रचना ही समान सार्वभौमत्व या तत्त्वावर आधारित आहे. प्रत्येक देशाला समान मताधिकार, पण वास्तवात, लष्करी आणि राजनैतिक शक्तीमुळे यूएनओच्या कार्यप्रणालीवर त्यांचा मोठा प्रभाव आढळतो. सुरक्षा परिषदेचे पुनर्रचना व सदस्यत्व विस्तार ही जागतिक न्याय आणि समतेसाठी आजची सर्वार्ंत मोठी गरज आहे.

The world is burning; where is the United Nations?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *