व्यस्त राहाल तर मस्त राहाल…

आजच्या वेगवान जीवनात मानसिक ताण, अस्वस्थता आणि निराशा यांचा सामना अनेकांना करावा लागतो. अशा परिस्थितीत माणूस सतत काहीतरी सकारात्मक, उपयोगी कामात गुंतलेला राहिला तर नकारात्मक विचार, ताणतणाव, कंटाळा आपोआप दूर राहतो. मन निरोगी राहते, आत्मविश्वास वाढतो. वेळेचा योग्य उपयोग होतो. आयुष्यात समाधान मिळते. काम, छंद, व्यायाम, शिकणे काहीही असो, पण मन गुंतलेले ठेवले तर जीवन खरंच मस्त होते.
आजच्या धावपळीच्या युगात माणूस अनेक जबाबदार्‍यांनी वेढलेला आहे. कामाचा ताण, स्पर्धा, अपेक्षा यामुळे मनावर भार येतो. अशा वेळी जर आपण नकारात्मक विचारांना थारा दिला तर ते आपल्याला आतून पोखरतात. याउलट, आपली ऊर्जा विधायक कामांकडे वळवली तर मन स्थिर होते आणि जीवनात समाधान मिळते. व्यस्त राहणे म्हणजे केवळ सतत काम करत राहणे नव्हे, तर स्वतःच्या आवडी, ध्येय आणि कर्तव्य यांचा समतोल साधणे होय. जेव्हा माणूस आपल्या कामात, कुटुंबात, समाजसेवेत किंवा छंदांमध्ये रमतो, तेव्हा दुःख आपोआप कमी होते. तिरस्कार, मत्सर, द्वेष यांसारख्या भावना मनात टिकून राहण्यासाठी मोकळा वेळ लागतो. परंतु व्यस्तता या भावनांना मुळापासून उखडून टाकते. व्यस्त जीवनामुळे आत्मविश्वास वाढतो, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व अधिक सशक्त होते.
मानवी मन स्वभावतः विचारशील आहे. ते रिकामे राहिले की चिंता, भीती आणि नकारात्मक कल्पनांनी भरून जाते. म्हणूनच आपले मन सतत चांगल्या कामांत गुंतवणे आवश्यक आहे. अभ्यास, नोकरी, छंद, समाजकार्य किंवा कुटुंबाची जबाबदारी या सर्व गोष्टी माणसाला व्यस्त ठेवतात आणि जीवनाला दिशा देतात. व्यस्त राहण्याचे अनेक फायदे आहेत. कामात गुंतल्याने आत्मविश्वास वाढतो. आपण काहीतरी साध्य करत आहोत ही भावना समाधान देते. दुसरे म्हणजे, व्यस्त व्यक्तीला वेळेचे महत्त्व कळते. वेळेचा योग्य उपयोग केल्याने यशाच्या संधी वाढतात. मानवी जीवनात सुख-दुःख, यश-अपयश हे येतच असते. प्रत्येकाच्या वाट्याला कधी आनंद तर कधी वेदना येतात. मात्र, या वेदनांमध्ये अडकून न राहता, स्वतःला सकारात्मक आणि अर्थपूर्ण कामांमध्ये गुंतवून ठेवणे हीच खरी जीवनकला आहे. म्हणूनच आयुष्यात इतके व्यस्त राहावे की दुःख, पश्चात्ताप आणि तिरस्कार करण्यास वेळच उरू नये.
याशिवाय, व्यस्त राहिल्याने आरोग्य सुधारते. नियमित काम, व्यायाम, वाचन किंवा सर्जनशील छंद यामुळे शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतात. समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाल्यास मनात आनंद आणि समाधान निर्माण होते. रिकामेपणातून येणारी आळस आणि नकारात्मकता दूर होते.जीवन आनंदी आणि यशस्वी करायचे असेल तर सतत सकारात्मक, सर्जनशील आणि उपयुक्त कामांत स्वतःला गुंतवणे आवश्यक आहे. योग्य व्यस्तता माणसाला ऊर्जा, उत्साह आणि समाधान देते. वेळेचे नियोजन करून, आवडीनुसार काम सतत काहीतरी उपयोगी काम करत राहिल्याने मन नकारात्मक विचारांपासून दूर राहते.
सतत व्यस्त राहणे म्हणजे केवळ धावपळ करणे नव्हे, तर अर्थपूर्ण आणि सकारात्मक कामांत स्वतःला गुंतवणे होय. अशा व्यस्ततेमुळे मन प्रसन्न राहते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात शिस्त येते. व्यस्त माणूस खर्‍या अर्थाने आनंदी राहू शकतो. शेवटी असे म्हणता येईल की, जीवनात आनंद, समाधान आणि यश हवे असेल तर स्वतःला सतत चांगल्या कार्यात व्यस्त ठेवले पाहिजे. व्यस्त राहिल्याने चिंता दूर राहते आणि मन प्रसन्न होते. जीवनातील दुःख आणि तिरस्कार यांपासून दूर राहण्याचा
सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला सकारात्मक कामांमध्ये गुंतवून ठेवणे. व्यस्तता ही केवळ वेळेची नव्हे, तर विचारांची आणि भावनांचीही असली पाहिजे. शेवटी एवढेच म्हणता येईल की, आयुष्य अल्प आहे. ते नकारात्मकतेला घालवण्यापेक्षा, अर्थपूर्ण, सर्जनशील आणि आनंददायी कामांमध्ये गुंतवणे अधिक योग्य आहे. जेव्हा आपण असे जगतो, तेव्हा दुःख पचते आणि तिरस्काराला मनात स्थानच उरत नाही.
– श्रीकांत मगर, 9689117169

Stay busy and stay cool…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *