हॉर्मझ सामुद्रधुनी

आखातातील संघर्ष चिघळत असल्याने तेल पुरवठ्याचा गंभीर जागतिक प्रश्न निर्माण झाला आहे. इराणवरील हल्ल्यांंनंतर तेलाच्या किमती भडकल्या आहेत. जेथून तेलाची वाहतूक होत असते ती हॉर्मझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने वाहतूक बंद पडली आहे. पर्यायाने पुरवठा विस्कळीत होणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा विचार केला जात आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर 28
फेब्रुवारीपासून सुरू केलेले हल्ले थांबलेले नाहीत. हल्ल्यांंना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर प्रतिहल्ले केले. याशिवाय अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या आखाती देशांवर हल्ले केले. प्रतिहल्ले होणे स्वाभाविक होते. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक आठवडे हल्ले सुरू राहतील, इतकी तयारी आम्ही केलेली असल्याचे ते म्हणाले आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी फिनिश शब्द वापरला. याचा अर्थ, इराणची धार्मिक सत्ता पूर्णपणे उलथवून टाकण्याची त्यांची योजना आहे. हवाई हल्ले करून इराणची लष्करी युद्धसामुग्री कमकुवत करता येईल. मात्र, एखादा देश ताब्यात घेण्यासाठी जमिनीवरील कारवाई अपरिहार्य ठरते. इस्रायल आणि अमेरिकन सैन्य जेव्हा इराणमध्ये घुसेल, तेव्हाच जमिनीवरील लढाई सुरू होईल. त्यासाठी इराक, कुवेत, बहरिन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान या देशांतील अमेरिकन लष्करी तळांचा वापर करावा लागेल. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्यानंतरही अमेरिका व इस्रायलचे हल्ले थांबत नसल्याने इराणने तेल वाहतुकीची कोंडी करण्याचा म्हणजे हॉर्मझ सामुद्रधुनी बंद केली. या निर्णयाचा परिणाम युरोप आणि आशियातील देशांवर होणार आहे. त्यात भारत आहेच. जेथून तेलाची वाहतूक केली जाते, ती हॉर्मझ सामुद्रधुनी जहाजांसाठी बंद करण्यात आल्याची घोषणा इराणच्या क्रांतिकारी रक्षकांनी केली. या मार्गातून जाणारी जहाजे पेटवून दिली जातील, असा इशारा देण्यात आल्याचे इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. हल्ल्यांंनंतर इराणचा हा सर्वांत मोठा निर्णय आहे. त्यामुळे हा जागतिक तेल व्यापारात अडथळे येतील. हॉर्मझ सामुद्रधुनी म्हणजे पर्शियन (इराणी) आखातातील एक चिंचोळा मार्ग आहे, ज्यामधून जगातील सुमारे एक पंचमांश म्हणजे 20 टक्के तेल जाते. सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरिन, यूएई आणि स्वतः इराणमधील तेल आणि वायू जहाजे येथूनच जातात. यातील बहुतेक पुरवठा आशियासाठी विशेषतः चीनसाठी केला जातो. आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल भारत आयात करतो. यात इराणच्या तेलाच्या मोठा हिस्सा आहे. ही सामुद्रधुनी सवार्ंत अरुंद आहे. अंदाजे 33 किलोमीटर रुंद आहे आणि पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. इराण आणि ओमान येथील पाण्यावर नियंत्रण ठेवतात; परंतु हा एक आंतरराष्ट्रीय जलमार्ग मानला जातो, जिथून जहाजांना जाण्याचा अधिकार आहे. दुबईसारखी ठिकाणे त्याच्या अगदी बाहेर आहेत. येथे वाहतूक थांबवली गेल्याने तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. फेब्रुवारीत लष्करी सरावांदरम्यान इराणने काही भागांत वाहतूक रोखली होती, ज्यामुळे तेलाच्या किमती 6 टक्क्यांनी वाढल्या होत्या. इराण-इस्रायल युद्धामुळे नैसर्गिक वायूच्या दरात 50 टक्के, तर कच्च्या तेलात दहा टक्के वाढ झाली आहे. इराणने यापूर्वीही अनेक वेळा हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली होती; परंतु आता युद्ध पेटल्याने आणि
सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्याने इराणला जगाला असलेल्या तेलाच्या गरजेची चिंता नाही. तेल पुरवठ्यातील व्यत्ययाचा आशियाई बाजारपेठांवर विपरीत परिणाम होईल. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडे काही पाइपलाइन मार्ग आहेत, त्या हॉर्मझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, पण बहुतेक तेलासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही. इराणच्या निर्णयाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार असून, भारतावरही परिणाम होणार आहे. अमेरिकेच्या सांगण्यावरून भारताने रशियन तेल घेणे बंद केल्याची पुष्टी कोठेही नाही. मात्र. भारताने रशियन तेल घेण्याचे बंद केल्याचा दावा ट्रम्प सतत करत आले आहेत. त्यांचा दावा खरा असेल, तर तेल कोठून मिळवायचे, हा भारतासमोर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. भारताला व्हेनेझुएलाचे तेल अमेरिकेमार्फत मिळू शकते, पण ते महाग पडेल. रशियाकडून भारताला स्वस्तात तेल मिळत होते. ते बंद झाल्यानंतर इराणवरील हल्ल्यांंनंतर आणखी पंचाईत झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले अधिक तीव्र केले आहेत. इराणने हॉर्मझ सामुद्रधुनीतून वाहतूक बंद केल्याने तेल पुरवठ्यावर बंधने आली आहेत. पर्यायाने पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोकादेखील वाढला आहे. खनिज तेलाचे दर वेगाने आता वाढू लागले आहेत. युद्ध आणखी भडकले तर इराण किंवा मध्यपूर्वेतून खनिज तेलाची आयात कशी करायची?असा प्रश्न आहे. पुरवठा कमी होत तो हळूहळू बंद पडण्याची अधिक चिन्हे आहेत. इराणजवळील पर्शियन आखातातील हॉर्मझ सामुद्रधुनीतून प्रामुख्याने खनिज तेलाची वाहतूक केली जाते. समुद्र वाहतुकीचा हा चिंचोळा मार्ग आहे. युद्धामुळे या परिसरात हल्ले अधिक तीव्र झाले तर हा मार्ग पूर्णपणे बंद होणार आहे. पर्यायाने या मार्गाने होणार्‍या खनिज तेलाच्या पुरवठ्याचे संकट निर्माण होणार आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायूचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील खनिज तेलाचा प्रति पिंपाचा दर गुरुवारी 72.79 डॉलर होता. शुक्रवारी त्याचा दर 67 डॉलर होता. आंतरराष्ट्रीय श्रेणीतील ब्रेंट क्रूडच्या एका पिंपाचा दर काल 79.51 डॉलर होता. शुक्रवारी एका पिंपासाठी 72.87 डॉलर्स द्यावे लागत होते. त्यात नऊ टक्के वाढ झाली. गेल्या सहा महिन्यांत प्रथमच एवढी वाढ दिसली. एकंदरीत जागतिक ऊर्जा संसाधनाचे दर वाढले तर सामान्य ग्राहकांच्या खिशावर आर्थिक बोजा पडणार आहे. खनिज तेलाचे दर वाढले की, किराणा मालाचे दरही वाढणार आहेत. परिणामी महागाईत भर पडणार आहे. सामुद्रधुनीतून जाणारे टँकर हे सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरिन, यूएई आणि इराणमधूून तेल आणि वायू घेऊन जातात. इराणने फेब्रुवारीपासून हा मार्ग तात्पुरता बंद केला होता. या परिसरात लष्करी कवायती करणार असल्याने तसा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे काही दिवसांत खनिज तेलाचे दर सहा टक्क्यांनी वाढले. जागतिक खनिज तेलाचे उत्पादन करणार्‍या आठ देशांनी (ओपेक संंघटना) रविवारी उत्पादन वाढविण्याची घोषणा केली. युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांनी याबाबत बैठक घेतली होती. त्यात एप्रिलमध्ये
दररोज दोन लाख सहा हजार पिंपांचे उत्पादन वाढवणार असल्याचे म्हटले होते. उत्पादन वाढवणार्‍या देशांमध्ये सौदी अरेबिया, रशिया, इराक, संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कझाकस्तान, अल्जेरिया आणि ओमान यांचा समावेश आहे. मात्र, वाहतुकीचा प्रश्न आहे. इराणकडून दररोज सुमारे एक लाख 60 हजार तेलाच्या पिंपाची निर्यात केली जाते. बहुतेक चीनला निर्यात केली जाते. जर इराणची निर्यात विस्कळीत झाली तर पुरवठ्यासाठी इतरत्र शोध घ्यावा लागू शकतो, हे आणखी एक कारण आहे, जे ऊर्जेच्या किमती वाढवू शकते. तथापि, चीनकडे भरपूर खनिज तेलाचे साठे आहेत. रशियाकडून तो त्यांची आयातदेखील वाढवू शकतो. जवळपास सर्वच देश आपापल्या परीने पर्याय शोधत आहेत.

Strait of Hormuz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *