प्रतिक्रिया देण्याचा मोह टाळायला हवा!

सांप्रतकाळी समाजमाध्यमांवर विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि जातीय विचार अथकपणे प्रसवले जातात. त्या विचारांवर आपण आपली प्रतिक्रिया तत्काळ दिली पाहिजे असं कोणतंही बंधन नसतं. असं असूनही आपल्यापैकी अनेकांना प्रतिक्रिया देण्याचा मोह अनावर होतो. तत्काळ प्रतिक्रिया दिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. आपण काहीतरी लिहून टाकतो. त्यातून भडाग्नी चेतवला जातो आणि त्यात व्यक्तिगत व सामाजिक सलोखा जळून खाक होतो.
प्रतिक्रियेतून विविध समस्या निर्माण होतात म्हणून प्रतिक्रियेऐवजी आपण प्रतिसादाचा मार्ग चोखाळला पाहिजे. या पाश्वर्र्भूमीवर क्रिया, प्रतिक्रिया, साद आणि प्रतिसाद या शास्त्रीय संकल्पना वाचकांना सोप्या शब्दांत समजावण्याचा प्रयत्न करणे हा या लेखाचा खरा उद्देश आहे.
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे! असं म्हणत आपल्या पूर्वजांनी आपल्या कृतीला अनन्य साधारण महत्त्व दिलं आहे. त्याचवेळी विज्ञान असं म्हणतं की, प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळतच असते. बरेचदा प्रतिक्रिया ही क्रियावरोधक अशीच असते. त्यामुळेच आपल्याला प्रतिक्रियेचं भय वाटत असतं.
क्रिया ही आव्हान असेल तर तिची प्रतिक्रिया उमटू शकते. याऊलट क्रिया ही आवाहन असेल म्हणजे ती कुणीतरी घातलेली साद असेल तर तिथे प्रतिसाद मिळण्याची शक्यता असते. साधारणतः प्रतिक्रिया ही नकारात्मक, तर प्रतिसाद हा सकारात्मक असतो असे मानले जाते. त्यामुळे प्रतिसाद सर्वांनाच हवाहवासा वाटतो.
मानवी वर्तन आणि संवादाच्या क्षेत्रात प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या दोन्ही संकल्पना खूप महत्त्वाच्या आहेत. प्रतिक्रिया ही भावनेचा उद्गार असल्याने ती वेगवान असते. प्रतिसाद मात्र विचारपूर्वक आणि संयमातून आलेला असतो.
प्रतिक्रिया म्हणजे एखादी घटना किंवा प्रसंगात कारण परिणामांचा कोणताही मागचा-पुढचा विचार न करता उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद होय. जसे की, रस्त्यावर एखाद्या व्यक्तीने आपल्या गाडीला धडक दिली तर लगेच रागावून ओरडणे किंवा शिवीगाळ केली जाते. ही प्रतिक्रिया आहे. त्यामुळे समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.
प्रतिसाद म्हणजे परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन, कारण परिणामांचा सारासार विचार करून शांतपणे दिलेला संयमित प्रतिसाद होय. जसे की, एखाद्या व्यक्तीने आपल्या गाडीला धडक दिली तर परिस्थितीचे व झालेल्या नुकसानीचे आकलन करून घेत समोरच्याशी शांतपणे बोलले जाते किंवा आवश्यक असेल तर पोलिसांना कळवले जाते. त्यामुळे समस्या सोडवणे शक्य होते.
माणसे प्रतिसादाऐवजी प्रतिक्रिया देण्यास लवकर प्रवृत्त होतात. कारण उत्क्रांतिशास्त्रानुसार ती मेंदूची संरक्षक वृत्ती असते. भावनिक आवेग आणि पूर्वानुभवांमुळे सम्यक विचार सुरु होण्यापूर्वीच व्यक्तीचा प्रतिसाद वेगाने येतो. मानवी मेंदूमधील भावनिक केंद्राला एखाद्या घटना प्रसंगात धोका किंवा तणाव वाटला की लगेच वेगाने प्रतिक्रिया येते. राग, भीती किंवा पूर्वग्रहांमुळेसुध्दा अवचेतन मनाकडून तत्काळ प्रतिक्रिया येते.
प्रतिक्रियेची जागा प्रतिसादाने घेता यावी यासाठी सराव आणि शिस्त आवश्यक असते. प्रतिसादासाठी वेगवेगळे पर्याय निवडून त्यांचा सराव करावा लागतो. ध्यानधारणा किंवा माइंडफुलनेसच्या मदतीने प्रतिसादाचे कौशल्य वाढविता येते. हे कौशल्य नियमित सरावाने वाढते. त्यामुळे परस्परसंबंध सुधारतात. कौटुंबिक जीवनात आपल्या मुलाने चूक केली तर लगेच त्याच्यावर ओरडू नका. त्याऐवजी शांतपणे त्याला चुकीचे कारण विचारा. ती चूक टाळण्यासाठी त्याला मार्गदर्शन करा. यामुळे परस्पर विश्वास वाढीस लागतो.
पती-पत्नीमध्ये काही वाद झाल्यास तू नेहमी असंच करतेस/करतोस! असं म्हणण्याऐवजी मला असं वाटतं असा शांत प्रतिसाद द्या. कार्यालयात बॉसने चुकीची कमेंट केली तर त्याला तुमचा राग दाखवण्याऐवजी मी हे सुधारतो असं म्हणून समस्येचं कारण शोधा आणि त्याचं निराकरण करा. अशाने तुमची प्रतिमा उंचावेल. तुमच्या सहकार्‍याला त्याच्या चुकीसाठी दोष देण्याऐवजी एकत्र बसून त्यावर उपाय शोधा. असं केल्यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि तुम्ही सुखी व्हाल.
प्रतिसाद देण्याचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे आपले वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवन सुधारु शकते. प्रतिसाद देण्याच्या सवयीमुळे आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढते, ताण कमी होतो, स्व-नियंत्रण वाढते. आपल्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही. त्यामुळे मानसिक शांतता मिळते.
सामाजिक सलोख्याला चुड लावणारा विचार प्रसवणारे लोक अतिशय थंड डोक्याने हा खेळ खेळत असतात. आपली शिकार करायला टपून बसलेले हे लोक राक्षसी सत्ताकांक्षा बाळगून असतात. हे आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळतच नाही. समाजमाध्यमांवरचे हे विचार आपल्या अनुभवातित आणि म्हणूनच आकलनापलीकडचे असतात. अशावेळी प्रतिक्रिया आपले काही क्षण वाचविणारी असली तरी प्रतिसाद आपले संपूर्ण जीवन वाचविणारा असतो! हे लक्षात घेऊन आपण प्रतिक्रिया देण्याचा मोह प्रयत्नपूर्वक टाळायला हवा. त्यामुळे आपली पुढे होणारी फरपट थांबविता येते.

The temptation to react should be avoided!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *