पळसे सोमय्यानगर पाटावरील पूल खचला

प्रवाशांचा जीव धोक्यात, नवीन पुलाची मागणी

नाशिकरोड : प्रतिनिधी
सोमय्यानगरजवळील कडवा पाटावरील पुलाजवळ होणार्‍या अपघातांची मालिका थांबवा, अशा आशयाचे निवेदन शिवसेनेकडून 26 मार्च 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. मात्र, संबंधित विभागाने कोणतीही उपाययोजना आजतागायत न केल्याने काल या पुलाच्या एका बाजूचा भाग खचला. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला या पुलाने धोका निर्माण झाला आहे. पुलाची तातडीने नव्याने निर्मिती करावी, अशी मागणी पंचक्रोशीतून होत आहे.
नाशिक साखर कारखाना ते बंगाली बाबा रस्त्यावरील सोमय्या- नगरजवळील कडवा पाटावर असलेला पूल तिरपा आहे. या पुलावर सतत अपघात होत असूनस अनेक वाहनचालकांना रात्रीच्या वेळी आपला जीव गमवावा लागला आहे. हा पूल पूर्वी पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे. आता त्यावर रहदारी वाढल्याने धोका निर्माण झाला आहे. नऊ-दहा वषार्ंपूर्वी हा रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. तातडीने त्याचे बांधकाम सरळ करून वाहनधारकांचा जीव वाचवावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज पालवे यांच्याकडे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी मार्च 2025 ला केली होती. मात्र, या मागणीकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने पळसे, शिंदे, वडगाव पिंगळा, नाणेगाव आदी गावांचा येणार्‍या काळात संपर्क तुटतो की काय, असा सवाल उभा राहिला आहे.
सोमय्यानगरजवळील कडवा पाटावरील पुलाला मोठे अपघाती वळण आहे. याठिकाणी कडवावर नवीन पूल तातडीने मंजूर करून दक्षिण-उत्तर रस्त्याप्रमाणे सरळरेषेत पुलाचे बांधकाम करावे, याच रस्त्यावरील सरोदे-गायखे मळ्याच्या शिवनाल्यावर नासाकाने बांधलेला हा पूल मोडकळीस आला आहे. तेथे अजून किती वाहनचालक, प्रवासी जाण्याची संबंधित प्रशासन वाट पाहणार आहे? आता तातडीने नवीन पूल बांधावा, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, सरपंच शोभा गायधनी, भाऊसाहेब गायधनी, नवनाथ गायधनी, किरण नरवडे, समाधान गायखे, माधव गायधनी, राजेंद्र गायधनी, शिवाजी गायधनी, अनिल गायधनी, नंदू नरवाडे आदींसह नागरिकांनी केली आहे.

The bridge over the Palse Somaiyanagar bridge collapsed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *