ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. भाषा ही संवाद आणि विकास, प्रगतीचे एक प्रभावी माध्यम आहे. भाषेत तिची लिपी आणि वापर खूप महत्त्वाचा आहे. भाषेचे शुद्ध स्वरूपदेखील महत्त्वपूर्ण आहे. भाषा ही काही अंतरावर बदलत असते. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. ती देववाणी संस्कृतपासून निर्माण झालेली आहे. मराठी भाषेला प्राकृत भाषा असेही म्हटले जाते.
इंग्रज, अरब, तुर्क, अफगाण आदी परकीय राज्यकर्ते आणि आक्रमक यांच्या प्रभावामुळे भारतीय भाषांमध्ये तुर्की, फारसी, अरबी, इंग्रजी व अन्य पारिभाषिक शब्द मिसळले. परकीय शब्दापासून सुटका करणे म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्तीचे एक अंग आहे, असा स्वा. सावरकर यांचा विचार होता. त्यामुळे त्यांनी भाषाशुद्धीचे महान कार्य केले. त्यांनी परकीय शब्दांना सुटसुटीत, चपलख आणि अर्थवाही मराठी शब्द दिले. उदाहरणार्थ मूव्हीसाठी चित्रपट, तारीखसाठी दिनांक, शहीदसाठी हुतात्मा, टेबलसाठी पटल, चौकार, षटकार, निर्धाव, बाद, झेल इत्यादी. स्वा. सावरकरांनी साहित्य, विज्ञान, व्यवहार, दैनंदिन जीवन, क्रीडा आदी अनेक क्षेत्रांत परभाषेतील अनेक शब्दांना पर्यायी मराठी शब्द दिले आहेत. स्वा. सावरकरांचे हे आपल्यावर थोर उपकार आहेत. अरबी आणि रोमन लिपीमध्ये जोडाक्षरे, काना, मात्रा, वेलांटी, उकार इत्यादी व्याकरण चिन्हांचा उपयोग करता येत नसल्याने शब्दाचा अर्थाचा अनर्थ होण्याची दाट शक्यता असते. देवनागरी लिपी अधिक शास्त्रशुद्ध आणि अचूक असल्यामुळे तिचा अंगीकार करावा, असा शास्त्रीय दृष्टिकोन स्वा. सावरकर आणि भगतसिंग या दोघांनीही दिला. त्यांना परकीय भाषांविषयी आकस किंवा तिरस्कार नव्हता.
स्वतंत्र भारताच्या संघटित, एकात्मक, स्वतंत्र वाटचालीसाठी भाषा धोरण काय असावे जेणेकरून भारतीय संस्कृती आणि समाजमन यांच्या विविध पैलूंमध्ये ओतप्रोत भरलेले भारतीयत्व भाषांमध्ये आणि साहित्यात प्रतिबिंबित होणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रभाषा हिंदी आणि देवनागरी लिपी राष्ट्र लिपी म्हणून घोषित करण्यासाठी पाठपुरावा केला.
अनुमानाने 2400 वर्षांपूर्वी समर्थपणे राज्य चालवणारी मराठी योद्धा राणी नागनिका. याच राणीच्या मराठी भाषेतील शिलालेखाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. सातवाहन राजवंश हे महाराष्ट्रावर सलग साडेचारशे वर्षे राज्य करणारे सवार्ंत प्राचीन राज्य होते. सातवाहन हे महाराष्ट्रातील इसवी सनपूर्वी 222 ते इसवी सन 228 या कालावधीतील पहिले ऐतिहासिक राजघराणे होते. नाणेघाटाच्या परिसरात सातवाहनांचे राज्य होते. त्यांनी व्यापारी मार्ग, लेण्यासुद्धा बनवल्या होत्या. येथील सम्राट सातकर्णी राजाच्या निधनानंतर त्यांची पत्नी राणी नागनिका (नयनिका) यांनी समर्थपणे राज्य चालवले. त्यांनी लेण्यांच्या भिंतीवर 2200 ते 2500 वर्षाहून अधिक जुना प्राचीन मराठी भाषेतील शिलालेख कोरून घेतला होता. हा लेख ब्राह्मी लिपीत आणि प्राचीन मराठी प्राकृत भाषेत लिहिला होता. या दगडी शिलालेखात तिच्या राजवंशाचे कुळ, त्यांचे पराक्रम, प्रचंड केलेला दानधर्म आणि आत्ताच्या महाराष्ट्रासाठी महारठी असा केलेला उल्लेेख आढळतो. राणीच्या याच मराठी भाषेतील शिलालेखाने मराठीला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला.
आज मराठीची दयनीय अवस्था आहे. राज्यात 225 मराठी शाळा बंद झाल्या आहेत. आताची मराठी ही अतिशय अशुद्ध झाली आहे. मराठी भाषा गौरव दिन एक किंवा दोन दिवस साजरा करून चालणार नाही, तो 365 दिवस साजरा केला पाहिजे. कवी कुसुमाग्रज म्हणतात, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देश ही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे…
स्वामी विवेकानंद म्हणतात, राष्ट्राच्या आचार, आहार, वेशभूषा आणि भाषा सोडल्याने हळूहळू राष्ट्रीयत्वाचा लोप होतो आणि त्यामुळे माणसाचे अध:पतन होते. मराठी जगवूया, मराठी वाचवूया!
Language: An effective medium of communication, development and progress