विविध रस्तेकामांच्या धूळ प्रदूषणाने आरोग्यावर परिणाम

आ. फरांदेंची सरकारकडे तातडीने कारवाईची मागणी; विधानसभेत लक्षवेधी

नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक शहरात वाढत चाललेले रस्त्यांवरील खड्डे, धूळ प्रदूषण, तसेच विविध यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून
उपस्थित केला.
नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे कामकाज पूर्णपणे दिशाहीन झाले असून, शहरातील विविध विकासकामांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे आमदार फरांदे यांनी लक्षवेधीत नमूद केले. विशेषतः महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. (एमएनजीएल) कंपनीकडून गॅस पाइपलाइन टाकणे, इमारतींवर गॅस पाइपलाइन बसवणे तसेच गॅस पुरवठा सुरू करण्यासाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या कामांसाठी महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जात असले तरी प्रत्यक्षात प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते खोदले जात असल्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. संबंधित कंपनीकडून रस्ते दुरुस्तीसाठी रक्कम भरून घेतली जात असतानाही त्या रकमेचा वापर वेळेत रस्ते दुरुस्तीसाठी केला जात नाही. तसेच या रकमेचा वापर रस्ते दुरुस्ती सोडून इतर प्रयोजनासाठी देखील करण्यात येत आहे. परिणामी, शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे आमदार फरांदे यांनी अधोरेखित केले.
याशिवाय, आगामी कुंभमेळा (सिंहस्थ) 2027 च्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे सुरू असताना मोठ्या प्रमाणावर धूळ सर्वत्र पसरत असून, त्यावर नियंत्रणासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना प्रशासनाकडून केली जात नसल्याची टीकाही
त्यांनी केली.
तसेच शहरात सुरू असलेल्या इमारतींच्या रीडेव्हलपमेंट कामांदरम्यान सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, बांधकामस्थळी संरक्षक जाळी न लावता कामे केली जात आहेत. बांधकामासाठी जाणार्‍या वाहनांमधून साहित्य रस्त्यावर पडत असल्याने तसेच रस्त्यावर पसरलेल्या धुळीमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही त्यांनी लक्षवेधीत नमूद केले.
या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, श्वसनासंबंधी आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नाशिक महानगरपालिका प्रशासन तसेच संबंधित शासकीय यंत्रणांकडून या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला.

Dust pollution from various road works affects health

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *