पंचवटीत पाणीप्रश्नी भाजप-उद्धवसेनेचे नगरसेवक आले आमने-सामने

द्वारकेचा पाणीपुरवठा प्रियंका मानेंकडून बंद; पाणीप्रश्नावरून आजची महासभा वादळी ठरणार

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील पाणीप्रश्नावरून नागरिक वैतागले असताना, गुरुवारी (दि.5) सकाळी पंचवटीतल्या नगरसेविका प्रियंका माने व प्रभाग पंधराच्या नगरसेविका सीमा पवार यांच्यात राडा झाल्याचे दिसून आले. आमच्या हक्काचे पाणी असूनही पाण्यासाठी आमच्यावर वणवण करण्याची वेळ येत असल्याचे म्हणत माने यांच्याकडून द्वारकेचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर द्वारकेचा पाणीपुरवठा का होत नाही, याची खातरजमा करण्यासाठी सीमा पवार गेल्या असता त्यावेळी दोन्ही नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आज शुक्रवारी (दि.6) रस्ते व पाणीप्रश्नावर होणारी महासभा कमालीची वादळी ठरणार आहे.
शहरात आतापासूनच पाणी समस्येने डोके वर काढले असून, नागरिकांना पाण्यासाठी वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, पंचवटीतील निलगिरी बाग जलकुंभावरून द्वारका परिसराला होणारा पाणीपुरवठा रोखल्याने गुरुवारी (दि.5) सकाळी लोकप्रतिनिधींमध्येच राडा झाला. प्रियंका माने आणि सीमा पवार या दोन नगरसेविका आपल्या समर्थकांसह आमने-सामने आल्याने जलकुंभावर काही काळ तणाव होता. शुक्रवारी होणार्‍या महासभेत पाण्यावरून लोकप्रतिनिधी आक्रमक भूमिका घेणार असल्याने पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी धास्तावले आहेत. पंचवटीतील निलगिरी बाग जलकुंभातून द्वारका परिसराला पाणी पुरवले जाते. मात्र, आमच्याच भागात पाण्याचा दुष्काळ असताना दुसर्‍या भागाला पाणी का? असा सवाल करत नगरसेविका प्रियंका माने व पप्पू माने यांनी आक्रमक पवित्रा घेतला. थेट जलकुंभावर जात द्वारकेला जाणारा व्हॉल्व्ह बंद केला. यामुळे द्वारका परिसरातील सुमारे दीड लाख नागरिकांचा पाणीपुरवठा सकाळच्या सत्रात ठप्प झाला होता. द्वारका परिसरात पाणी का येत नाही हे जाणून घेण्यासाठी उद्धवसेनेच्या नगरसेविका सीमा पवार व विशाल पवार हेदेखील पाहण्यासाठी गेले असता तेथे द्वारकेला पाणीपुरवठा करणारा व्हॉल्व्ह बंद केल्याचे दिसून आले. मात्र, याचवेळी पवार व माने यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पाणीपुरवठा बंद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा जाब पवार यांनी विचारला. दरम्यान, अधिकार्‍यांच्या मध्यस्थीनंतर सकाळी 11 वाजता द्वारका परिसरात पाणी सोडण्यात आले.

प्रभाग क्रमांक तीनमध्ये आमच्या हक्काच्या पाण्याची चोरी केली जाते. ही चोरी तात्काळ थांबवण्यात यावी. द्वारकेला सकाळ, सायंकाळ दोन्ही वेळ पाणी दिले जाते. मात्र, प्रभाग तीनला एका वेळेचे पूर्ण पाणी मिळत नाही. जलकुंभ आमच्याच प्रभागात असताना पाण्यावाचून राहावे लागते तर द्वारकेला तब्बल दहा ते बारा एमएलडी पाणी जाते. हा आमच्या प्रभागावर सर्वांत मोठा अन्याय असून, अधिकारीही लक्ष द्यायला तयार नाहीत. नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत असल्याने द्वारकेचा पाणीपुरवठा बंद पाडण्याची वेळ आली.
– प्रियंका माने, नगरसेविका, पंचवटी विभाग

अशा प्रकारे पाणीपुरवठा बंद करण्याचा संबंधितांना कोणी अधिकार दिले. परीक्षेचे दिवस असताना द्वारका परिसरातील हजारो विद्यार्थ्यांचे, कामगार, नोकरदार आणि महिलांचे हाल झाले. जलकुंभ कोणाच्या मालकीचे नाहीत. याबाबतचा जाब महासभेत आयुक्तांना आणि संबंधित नगरसेवकांना विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. – सीमा पवार, नगरसेविका, द्वारका विभाग

BJP-Uddhav Sena corporators come face to face over water issue in Panchavati

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *