खत प्रकल्पातील दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

नगरसेविका माधुरी डेमसेंचा कार्यपद्धतीच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा

सिडको : प्रतिनिधी
मुंबई महामार्गावरील नाशिक महानगरपालिकेच्या कचरा डेपोमुळे पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कचरा डेपोमध्ये कचरा टाकताना कोणत्याही प्रकारचा संरक्षक थर किंवा प्लास्टिक लाइनर न टाकता कचरा थेट जमिनीवर टाकला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच कचर्‍यातून निर्माण होणारे दूषित पाणी साठवण्यासाठी डेपो परिसरात खड्डा करण्यात आला असला, तरी त्या खड्ड्यातही कोणताही संरक्षक लेयर न टाकता पाणी साचवले जात असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका माधुरी डेमसे यांनी केला असून, या खत प्रकल्पातून निघणार्‍या दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा खत प्रकल्पाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

स्थानिक नगरसेविका माधुरी डेमसे यांनी सांगितले की, या खड्ड्यात साचलेले पाणी हळूहळू जमिनीत झिरपत आहे. त्यामुळे हे दूषित पाणी शेजारील शेतजमिनीतील विहिरींमध्ये मिसळत आहे. त्याचा परिणाम विहिरीतील पाण्याची गुणवत्ता खालावत असल्याने शेती करणे शेतकर्‍यांसाठी अधिक कठीण होत चालले आहे. दूषित पाण्याचा परिणाम पिकांवर होत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्यामुळे परिसरातील अनेक शेतकरी चिंतेत असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही होत असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील अनेक घरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बसवलेले वॉटर फिल्टर अपेक्षेपेक्षा लवकर खराब होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. साधारणपणे सहा महिन्यांनी करावी लागणारी फिल्टरची सर्व्हिसिंग आता महिनाभरातच करावी लागत असल्याने नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिक आणि शेतकर्‍यांनी प्रशासनाने तातडीने या कचरा डेपोची पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेले नियम पाळले जावेत, डेपोमध्ये योग्य संरक्षक थर टाकण्यात यावेत तसेच दूषित पाण्याचे सुरक्षित व्यवस्थापन करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या खत प्रकल्पातून निघणार्‍या दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा खत प्रकल्पाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नगरसेविका माधुरी डेमसे यांनी दिला.

खत प्रकल्पातून निघणार्‍या दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींचे पाणी दूषित झाले असून, पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. या पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा खत प्रकल्पाच्या कार्यपद्धतीच्या विरोधात आंदोलनाशिवाय पर्याय नाही. – माधुरी डेमसे, नगरसेविका

The issue of contaminated water from fertilizer projects is on the agenda again.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *