एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावर उमराणेजवळ भीषण अपघात

उमराणे : प्रतिनिधी
देवळा तालुक्यातील उमराणेजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर जुन्या गंगासुख हॉटेललगत शुक्रवारी (दि. 6 मार्च) सकाळी साडेआठच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिकहून मालेगावच्या दिशेने जात असलेली टाटा पंच कार (एचएच 15, जेएम 5182) अचानक चालकाचा ताबा सुटल्याने नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. अपघातइतका भीषण होता की, गाडी जागेवर उलटी झाली अन् काही क्षणांतच आनंदाचा प्रवास दुर्घटनेत बदलला. अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (वय 38), त्यांचा लहान मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (वय 4 वर्षे) आणि त्यांची बहीण अंकिता किशोर नाफडे यांचा मृत्यू झाला, तर चालकाचे काका, काकू आणि पत्नी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका जखमीला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. चिंचवे येथील बाबाजी रुग्णवाहिका तसेच उमराणे येथील जे. के. रुग्णवाहिकेचे चालक राहुल वाघ व गणेश पवार हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस बेशिस्त होत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेक वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्यामुळे वारंवार अपघात होतात. त्यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन महामार्गावर गती नियंत्रित करणारे कॅमेरे बसवावेत, तसेच वाहतुकीवर कडक नियंत्रण ठेवून योग्य शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे.
या घटनेची माहिती देवळा पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे.

Three people from the same family died

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *