वैशाली जिभाऊ बोरसे या मेशी (ता. देवळा) येथील यशस्वी उद्योजिका. सर्वसामान्य गृहिणी ते उद्योजिका असा अत्यंत खडतर त्यांचा प्रवास आहे. वैशाली बोरसे यांचे माहेर मालेगाव तालुक्यातील नांदगाव. बी.ए., बी.एड. शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी मिळाली नाही. 2018 मध्ये पतीचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यावेळी मुले बारावीला शिकत होती. मुलांना डॉक्टर करावे, अशी पतीची इच्छा असल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण करायची होती. एकल महिला म्हणून जीवन जगताना सर्वांत मोठे आव्हान मुलांच्या शिक्षणाचे होते. पती गेल्यानंतर लगेच नोकरी करणे शक्य नव्हते. अशा वेळी टेलरिंग व शेती करीत उदरनिर्वाह केला. उदनिर्वाहासाठी काहीच साधन नव्हते. स्वतः पाच एकर जमीन एकटीने केली. शेताला पाणी (बारे) देण्यापर्यंत सर्व काम एकटीने केले. त्यानंतर शिवणकाम येत असल्याने शिलाईयंत्र घेतले. दिवसभर शेतीकाम आणि सायंकाळी टेलरिंग काम करायला सुरुवात केली. बचतगट सुरू केला. ’उमेद’ची माहिती मिळाली. देवळ्याला जाऊन ’उमेद’मध्ये प्रवेश केला. तिथून पुढे दरवर्षी उमेद वाढत गेली. कामाला सुरुवात केली तेव्हा बारा-पंधरा हजार रुपये कमवायचे. त्यावर कसाबसा खर्च भागायचा. शेतीच्या उत्पन्नात मुलांचे शिक्षण केले. तेव्हा शिवणकाम व शेती मिळून दोन ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्न सुरू झाले. एक मुलगा डॉक्टर, तर दुसरा इंजिनिअर झाला असून, आता ते कमवायला लागले आहेत. आता ते माझी काळजी घेतात.
Got ‘hope’ to live