परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य
नवी दिल्ली :
मध्यपूर्व भागांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, याची झळ आता भारतापर्यंत बसू लागली आहे. अनेक भारतीय नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटक हे आखाती देशांमध्ये अडकले आहेत. या सर्वांना सुरक्षितरीत्या भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेकांना भारतात आणण्यात आले आहे. देशातील तेलसाठा व गॅससाठा याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये माहिती दिली आहे.
सोमवारपासून (दि. 9)संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यात इराण-इस्रायल युद्धावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. अमेरिकेकडून ताप्तुरती रशियाकडून तेल खरेदीची परवानगी मिळाल्यामुळे देखील विरोधक आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर एस. जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये भूमिका मांडली आहे. त्यांनी भारतीय नागरिकांना सुरक्षित देशामध्ये परत आणणे, हे प्राधान्य असून, सरकार यासाठी कटिबद्ध अशी भूमिका घेतली आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर राज्यसभेमध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि संबंधित मंत्रालये प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी समन्वय साधत आहेत. आमच्या सरकारने 20 फेब्रुवारी रोजी निवेदन जारी करून खोल चिंता व्यक्त केली आणि सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक नीतीचा अवलंब केला पाहिजे, असे आमचे मत आहे. अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने मांडली
आहे.
विरोधकांकडून गदारोळ
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. भारत आपल्या गरजेच्या 55 टक्के ऊर्जा पश्चिम आशियातून पूर्ण करतो, त्यामुळे तिथल्या अस्थिरतेचा थेट परिणाम भारतावर होत आहे. सर्वार्ंत महत्त्वाचे म्हणजे, खाडी देशांमध्ये एक कोटी भारतीय कार्यरत असून, अलीकडच्या काळात झालेल्या संघर्षात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण बेपत्ता आहेत, असा मुद्दा खरगे यांनी मांडला. या पार्श्वभूमीवर त्यांनी संसदेत सविस्तर चर्चेची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, आमची फक्त एकच मागणी आहे की, या सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा व्हावी. पण सरकार त्यासाठी तयार नाही. पश्चिम आशियातील परिस्थिती, इंधनाच्या वाढत्या किमती आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम हे सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित मुद्दे आहेत. या विषयावर चर्चा झाल्यास अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतील, त्यामुळे सरकार चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकसभेचे कामकाज स्थगित
मध्यपूर्वेतील परिस्थितीवर संसदेत चर्चा करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. या गदारोळामुळे सोमवारी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी, इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरातील मकर द्वार येथे केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. या आंदोलनात राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरेगेदेखील सहभागी झाले होते.
Efforts are being made to bring those stranded in Gulf countries to India safely.