आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन. खरेतर 8 ऐवजी 10 मार्च रोजीच महिला दिन साजरा केला पाहिजे. कारण आज जेव्हा आपण स्त्रीमुक्ती आणि सक्षमीकरणावर चर्चा करतो, तेव्हा सावित्रीबाईंच्या स्मरणाशिवाय ती अपूर्ण ठरते. सावित्रीबाईंनी केवळ महिलांना अक्षरांची ओळख करून दिली नाही, तर स्त्रीला आत्मनिर्भर, स्वाभिमानी आणि स्वावलंबी होण्याचा मंत्र दिला. आज समाजात, देशात महिलांचे जे स्थान निर्माण झाले आहे, महिलांना जी ओळख निर्माण झाली आहे, त्याचे श्रेय फक्त सावित्रीबाई फुले यांनाच आहे.
आजच्या स्त्रीने शिक्षण, प्रशासन, विज्ञान, उद्योग, क्रीडा आदी क्षेत्रांत भरारी घेतली आहे. ती अगदी अंतराळातही झेप घेत आहे, हे पाहून सावित्रीबाईंच्या दूरदृष्टीची प्रचिती येते.
ज्या काळात स्त्रीचे अस्तित्व घराच्या उंबरठ्यापुरते मर्यादित होते, त्या काळात सावित्रीबाईंनी समाजाच्या बंदिस्त मानसिकतेवर प्रहार केला. त्यांनी उघडलेल्या ज्ञानाच्या कवाडातून स्त्रीच्या आयुष्यात आत्मविश्वासाचा नवा प्रकाश आला. या प्रकाशाने तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणासाठीच ज्ञानाचे कवाड उघडले असे नाही; त्यांनी स्त्रीला आत्मनिर्भर, स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनविण्याचा मार्ग खुला केला. त्यामुळे स्त्रीला
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. ती घराच्या चौकटीबाहेर पडली, समाजाच्या मुख्य प्रवाहात आली. स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहावे, कुटुंबाच्या आणि पुढच्या पिढीच्या विकासात सक्रिय भूमिका घ्यावी, हा त्यामागचा मोठा विचार होता. त्यामुळे आजची स्त्री केवळ पदवी मिळवण्यासाठी शिकत नाही, तर संसाराचा गाडा समर्थपणे हाकण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा करत आहे. मग ती शेतात ऊस तोडणारी मजूर असो, बांधकामावर विटा वाहणारी कष्टकरी असो त्याचप्रमाणे मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये अधिकारी असो किंवा राजकारणातील निर्णय घेणारी मंत्री असो; प्रत्येक ठिकाणी तिचा स्वाभिमान आणि जिद्द दिसून येते. सावित्रीबाईंना अभिप्रेत असलेली कर्ती स्त्री आज समाजात ठिकठिकाणी पाय रोवून उभी आहे. हीच ती स्त्री आहे, स्वावलंबी, कष्टाळू आणि कुटुंबाच्या तसेच समाजाच्या प्रगतीत कणखरपणे सहभागी होणारी.
आजच्या आधुनिक युगात स्त्रीला मिळालेल्या स्वातंत्र्याकडे पाहताना काही आव्हानेही समोर येत आहेत. स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे केवळ बंधने तोडणे नव्हे, तर स्वत्वाची आणि कर्तव्याची जाणीव असणे होय. सावित्रीबाईंनी उघडलेले कवाड हे प्रगतीचे प्रतीक होते. आज प्रगतीच्या या प्रवासात कौटुंबिक सौहार्द आणि सामाजिक वीण टिकवून ठेवणे हीदेखील स्त्रीची जबाबदारी आहे. आज आधुनिकतेच्या ओघात काही ठिकाणी नातेसंबंधांत दरी निर्माण होताना दिसते. ही चिंतेची बाब असली, तरी ती सुधारण्याची संधीही आहे. सावित्रीबाईंना अभिप्रेत असलेली स्त्री ही समाज जोडणारी होती. शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या सुखासाठी नसून, एक सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी व्हावा, हा त्यांचा मूळ विचार होता. त्यामुळे आजच्या स्त्रीने आपल्या प्रगतीसोबतच कुटुंब आणि समाजाचा समतोल राखण्याचे कौशल्य आत्मसात करणे, हीच सावित्रीबाईंना खरी श्रद्धांजली ठरेल आणि खर्या अर्थाने महिला दिन साजरा होईल. महात्मा जोतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई उभ्या राहिल्या. त्या केवळ सहचारिणी नव्हत्या, तर क्रांतीच्या वाटेवरील एक खंबीर सहकारी आणि समविचारी योद्धा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जोतिरावांची साथ सोडली नाही, हेही आजच्या स्त्रीने लक्षात घ्यावे.
आजच्या काळात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे आणि त्यात पुरुषांचाही (आजच्या काळातील जोतिरावांचा) सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. आज घराघरांत जोतिराव असताना घरच्या सावित्रीनेही त्यांना खंबीरपणे साथ दिली पाहिजे. आजची स्त्री पुढे पाऊल टाकते, तेव्हा ती केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर येणार्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण करते. सावित्रीबाईंनी उघडलेल्या त्या ऐतिहासिक कवाडातून सुरू झालेला हा प्रवास अधिक प्रगल्भ आणि जबाबदार बनवत पुढे नेणे, हेच आपल्या सर्वांचे ध्येय असावे. महिला दिन तेव्हाच साजरा होईल, जेव्हा त्या कवाडातून पुढे जाणारी प्रत्येक स्त्री स्वाभिमान, स्वावलंबन आणि संवेदनशीलतेची ज्योत जिवंत ठेवेल.