वर्दीमागचं आयुष्य

स्वतःचे अश्रू लपवून,
दुसर्‍यांचे अश्रू पुसणारे हात,
स्वतःच्या घरापासून दूर राहून,
समाजाची राखण करणारे पाय.
दिवस असो की रात्र,
ऊन असो की पाऊस,
कर्तव्याच्या वाटेवर अखंड
चालत राहणारे तेच पोलीस.
समाज शांतपणे झोपावा, रस्त्यावर सुरक्षितपणे चालावा आणि संकटाच्या वेळी कोणीतरी धावून यावं, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण त्या अपेक्षांच्या मागे उभा असतो एक माणूस पोलीस. समाजासाठी दिवस-रात्र उभा असलेला हा पोलीस अनेकदा स्वतःच्या आयुष्याचा, कुटुंबाचा आणि सुखाचा त्याग करत असतो. त्याच्या वर्दीच्या मागे संघर्षाची, वेदनेची आणि न संपणार्‍या कर्तव्याची एक मोठी कहाणी दडलेली असते.
पोलीस ही केवळ नोकरी नाही; ती एक जबाबदारी आहे, एक व्रत आहे. या व्रतात स्वतःच्या भावनांपेक्षा कर्तव्याला नेहमीच प्राधान्य द्यावं लागतं. अनेक वेळा असे प्रसंग येतात की स्वतःच्या आई-वडिलांची तब्येत बिघडलेली असते, त्यांना हॉस्पिटलमध्ये आपली गरज असते; पण त्याच वेळी कर्तव्यावर असलेला पोलीस एखाद्या आरोपीची सेवा करत असतो, त्याला रुग्णालयात घेऊन जात असतो. त्या क्षणी त्याच्या मनात किती कदाचित कधीच समजणार नाही. पोलीसही शेवटी एक माणूसच असतो. तो कोणाचा मुलगा, पती किंवा बाप असतो. त्यालाही आपल्या मुलांसोबत वेळ घालवायचा असतो, त्यांच्यासोबत खेळायचं असतं, त्यांच्या छोट्या-छोट्या आनंदात सहभागी व्हायचं असतं. पण अनेकदा त्याला स्वतःच्या मुलांना वेळ देता येत नाही. कारण तो दुसर्‍यांच्या हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करत असतो. एखाद्या आईच्या डोळ्यातील आसवं थांबवण्यासाठी तो स्वतःच्या मुलांच्या हसण्यापासून दूर राहतो. अनेकदा तर अशी वेळ येते की आपल्या नातेवाइकांच्या
दुःखद प्रसंगालाही तो उपस्थित राहू शकत नाही. घरात एखादा अंत्यसंस्कार असतो, पण तो कर्तव्यावर असल्याने तिथे जाऊ शकत नाही. मात्र दुसर्‍या एखाद्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर पडलेला असतो, त्याला सन्मानाने शेवटचा निरोप मिळावा म्हणून तो स्वतःच्या खिशातून खर्च करून त्याचा अंत्यसंस्कार करतो. ही भावना केवळ नोकरीतून येत नाही; ती माणुसकीतून येते.

पोलिसांच्या आयुष्यातील आणखी एक कठोर सत्य म्हणजे त्यांना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. आरोपींची वैद्यकीय तपासणी, गुन्ह्यांची चौकशी, वाहतूक नियंत्रण, गर्दीचे व्यवस्थापन, सण-उत्सवातील सुरक्षा या सगळ्या जबाबदार्‍यांमध्ये ते इतके गुंतलेले असतात की वेळेवर जेवण मिळेल की नाही याचीही खात्री नसते. अनेकदा इतर लोकांना वेळेवर घरी पोहोचता यावे म्हणून ते स्वतः मात्र उन्हात-पावसात तासन् तास रस्त्यावर उभे राहतात आणि अवेळी जेवून थकलेल्या शरीराला पुढे ढकलत राहतात.
पोलिसांची ड्यूटी ही घड्याळात मोजता येत नाही. कधी 12 तास, कधी 16 तास, तर कधी चोवीस तास सतत कर्तव्यावर राहावे लागते. त्यात वरिष्ठांचे आदेश, कधी कठोर शब्द, तर कधी जनतेचा रोष हे सगळं सहन करत ते काम करत राहतात. कितीही काम केले तरी समाजाकडून अनेकदा कौतुकापेक्षा टीकाच जास्त ऐकावी लागते. तरीही ते शांतपणे, संयमाने आणि निष्ठेने आपले कर्तव्य निभावत राहतात.
अनेकदा त्यांच्या स्वतःच्या घरातही समस्या असतात. घरातील वाद, अडचणी, आर्थिक ताण हे सगळं त्यांच्या आयुष्यातही असतंच. पण तरीही ते दुसर्‍यांच्या घरातील वाद मिटवण्यासाठी धाव घेतात. स्वतःच्या कुटुंबाच्या भावना बाजूला ठेवून समाजाची काळजी घेत राहतात. कारण त्यांना माहित असतं की त्यांच्या एका निर्णयावर अनेक लोकांचं आयुष्य अवलंबून असतं. म्हणूनच समाजाने पोलिसांकडे फक्त वर्दीतला अधिकारी म्हणून न पाहता, त्या वर्दीमागे असलेल्या माणसाकडे पाहण्याची गरज आहे. त्यांच्या त्यागाची, कष्टाची आणि सेवाभावाची कदर केली पाहिजे. टीका करणे सोपे असते, पण त्या वर्दीमागचं आयुष्य समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं.
कारण खर्‍या अर्थाने समाजाची सुरक्षा, शांती आणि विश्वास टिकवून ठेवणारे हात म्हणजे पोलीस वर्दीतले खरे समाजरक्षक.

Life behind the uniform

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *