अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध सुरू झाले. अनेक देशांत हळूहळू युद्धाचा पसारा पसरू लागला. आज भारताचा युद्धाशी संबंध नसला, तरी ते देशातील शेतकर्यांचे वाटोळे करणारे ठरत आहे. जगात कोठेही युद्ध सुरू झाले तर भरडला जातो तो अन्नदाताच! रशिया- युक्रेन युद्धात हेच घडले. शेतमालाचे दर कोसळले तर काही गोष्टी प्रचंड महाग झाल्या.
आता भारतातील कांदा, द्राक्ष, भाजीपाला यांचे प्रमुख खरेदीदार आखाती देश व याच आखाती देशांत युद्धाची झळ बसत आहे. विमानसेवा बंद पडली आहे. जेएनपीटी बंदरात हजारो कंटेनर कांदा, द्राक्षस भाजीपाला आखाती देशांत जाण्यासाठी अडकून पडले आहेत. हा कोट्यवधींचा माल हळूहळू खराब होईल व शेतकर्यांनाच फटका बसेल. दुबई शांत, शिस्तबद्ध देश. पर्यटक हीच त्यांची रोजीरोटी, पण युद्धाने त्यांना झटका दिला. सुंदर व श्रीमंत शहराचे बरेच नुकसान झाले व भविष्यात येथे पर्यटक कमी होत जातील. म्हणजे दुबईला दीर्घकाळाचा हा झटका बसला आहे. खरेतर जमिनीवरील युद्धात मर्यादित नुकसान, मनुष्यहानी होते. पण आता मिसाइल, बॉम्ब अनेक जीवघेणे प्रकार बघून जगाला धडकी भरावी असे हे युद्ध आहे. आता नेमका मुस्लिम समाजाचा श्रद्धेचा रमजानचा महिना सुरू आहे. या पवित्र महिन्यात मुस्लिम देश अमेरिकेशी, तर काही आपसांत भिडले आहेत. अनेक भारतीय नागरिक आखाती देशांत अडकून पडले आहेत. भारतासह जगभरातील नागरिक युद्धभूमीत अडकल्याने जगाला चिंता करावी लागत आहे. देशात आंदोलन झाले तर झळ बसते शेतकर्यांनाच. कोट्यवधी रुपयांचा शेतमाल अडकून पडतो व मोठे नुकसान होते.
पाकिस्तानला भारताची खोडी काढायची सवय आहे. अचानक अटारी-वाघा सीमा बंद होते व शेतमालाचे नुकसान होते. मध्यंतरी पंजाबच्या शेतकर्यांनी सलग काही वर्षे दिल्ली सीमा बंद केली व शेतमाल जाणेच बंद झाले. शेतकर्यांचे आंदोलन शेतकर्यांच्याच मुळावर उठले. मध्यंतरी बांगलादेशात क्रांती झाली. शेख हसीना भारतात पळून आल्या. त्यानंतर सुमारे वर्षभर बांगलादेश सीमा बंद झाल्याने कांदा, द्राक्ष, डाळिंबासह शेतमालाचे वाटोळे झाले. आताचे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. इंधन, गॅस यांचा तुटवडा होणार व भाव वाढणार. शेतकर्यांचा माल बरेच दिवस आखाती देशांत जाणार नाही. म्हणजे न भरून येणारे नुकसान होणार आहे.
आत्ताच देशात भाजीपाला, केळी, द्राक्ष, डाळिंब यांचे दर कोसळले आहेत. मोठी चिंता वाढली आहे. लवकरच जगाचा विनाश होईल, हे भाकीत बरोबर असल्याची ही सुरुवात समजायला हरकत नाही. आता भीती वाटावी अशी स्थिती तयार होत आहे. सुमारे 11 देशांत कमी-अधिक प्रमाणात युद्ध सुरू झाले असे वाटत आहे. तिसर्या महायुद्धाची सुरुवात तर नाही ना? अमेरिका जगावर वर्चस्वासाठी कोणत्याही थरावर जाऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांंचा निर्णय कसा फिरेल हे सांगता येत नाही. इतरांना अडचणीत आणता आणता अमेरिकेलाही संकटात लोटत आहेत. अमेरिकेने जवळपास सर्वच देशांत स्वतःचे लष्करी तळ तयार केले आहेत. त्यांचे नुकसान होत आहे. शेवटी जगातील सर्वसामान्य माणूस व शेतकरी सर्वांत जास्त संकटात आहेत.
मका, कांदा, सोयाबीनसह सर्वच शेतमालाचे दर कोसळत आहेत, हे नक्की. यापुढे शहाण्या शेतकर्यांनी कर्ज भरू नका. राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला व शेतकर्यांना दोन लाखांची कर्जमाफी दिली. पण नियमित कर्ज भरणारे महामूर्ख ठरले. त्यांना पन्नास हजारांचे प्रोहात्सन मिळाले. म्हणजेच थकवणारे शहाणे व वेळेवर कर्ज भरणारे महामूर्ख ठरवले. आता एक नक्की, अधूनमधून राजकारणात कोणताही पक्ष मतांसाठी कर्जमाफी देतच राहणार. ही प्रथा सुरू झाली आहे व ती कायमच राहील. आतासुद्धा तीन-चार लाख थकवलेले. वरचे पैसे फार कमी शेतकरी भरतील व सर्व माफीसाठी वाट बघतील. 2029 ला सर्वांना कर्जमाफीचे आश्वासन द्यावेच लागेल. यात बदल नाही. भविष्यात वेळेवर कर्ज भरणारे तयार करायचे असतील तर त्यांना सरसकट किमान दीड लाख रुपये द्यावेत, ही प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची मागणी आहेच.
Baliraja himself died in war.