कृषी कुंभासाठी 38 बस जाणार!

ग्रामीण बससेवा चार दिवस होणार विस्कळीत

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी कुंभ प्रदर्शनासाठी दि. 12 ते 15 मार्चदरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारातील तब्बल 38 बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस सिन्नर तालुक्यातील ग्रामीण तसेच मध्यम व लांब पल्ल्याच्या बससेवेवर परिणाम होणार असून, प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
जिल्हा प्रशासन, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे चार दिवसीय कृषी कुंभ या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी ग्रामपंचायत स्तरावरून शेतकर्‍यांना प्रदर्शनस्थळी ने-आण करण्यासाठी राज्य परिवहनच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींसाठी सिन्नर आगारातून 38 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या बसेस निर्धारित वेळापत्रकानुसार शेतकर्‍यांना प्रदर्शनस्थळी घेऊन जाऊन पुन्हा गावात सोडणार आहेत. सिन्नर आगारात एकूण 64 बसेस उपलब्ध आहेत. त्यापैकी 38 बसेस कृषी कुंभासाठी आरक्षित करण्यात आल्याने उर्वरित 26 बसेसपैकी सुमारे 10 बसेस नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात केवळ 16 बसेसवरच तालुक्यातील अंतर्गत वाहतुकीचा भार पडणार असून, काही मार्गांवरील बसफेर्‍यांमध्ये कपात करण्यात आली आहे. दरम्यान, सिन्नर आगारातून शिर्डी मार्गावर धावणार्‍या सात तसेच अहिल्यानगर मार्गावरील चार
बसफेर्‍या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवर प्रवास करणार्‍या प्रवाशांना आंतरजिल्हा आगारातील बससेवेवर अवलंबून राहावे लागणार आहे. गर्दीच्या मार्गांवरील काही बसफेर्‍या कमी करण्यात आल्या असून, ठाणगाव मार्गावरील दोन शटल सेवांपैकी एक बस रद्द करण्यात आली आहे. औंढेवाडी, वावी तसेच पूर्व भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या
बसफेर्‍या नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती सिन्नर आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर
यांनी दिली.

38 buses will go for Krishi Kumbha!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *