बारामती, राहुरीची पोटनिवडणूक जाहीर

अजित पवार आणि कर्डिलेंच्या रिक्त जागांसाठी 23 एप्रिलला मतदान

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी रविवारी (दि. 15)केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी निकाल जाहीर होईल.

जागा का रिकाम्या झाल्या?
राहुरी (जि. अहिल्यानगर) मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यानंतर बारामतीचे आमदार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यामुळे महाराष्ट्रात एकाचवेळी दोन हायप्रोफाइल जागा रिक्त झाल्या.

बारामतीत सुनेत्रा पवार लढणार
बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असून उपमुख्यमंंत्री सुनेत्रा पवार या जागेवर लढणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची माहिती आहे.

संपूर्ण वेळापत्रक
अधिसूचना जारी – 30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत- 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी- 7 एप्रिल
अर्ज माघारीची अंतिम तारीख- 9 एप्रिल
मतदान- 23 एप्रिल, मतमोजणी व निकाल- 4 मे 2026

बारामती ः राजकीयदृष्ट्या सर्वाधिक चर्चेची जागा
पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत सुमारे 1.9 लाख मतदार आहेत. या जागेवरील निकाल राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीवर थेट प्रकाश टाकेल आणि 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलेले असेल. बारामतीत पवार कुटुंबाचा उत्तराधिकारी कोण असेल आणि राहुरीत भाजप आपला गड राखेल का या प्रश्नांचे उत्तर 4 मे 2026 रोजी मिळेल.

आदर्श आचारसंहिता लागू
निवडणूक आयोगाच्या घोषणेसोबतच दोन्ही मतदारसंघांत आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

Baramati, Rahuri by-elections announced

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *