वाढदिवसाच्या दिवशीच बेपत्ता झाल्याने वाढले मृत्यूचे गूढ
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथील माध्यमिक आश्रमशाळेतील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. गुरुवारी (दि. 12) दुपारी तीनच्या सुमारास संजय सदू नडगे (वय 17) हा पिंप्री माध्यमिक आश्रमशाळेत दहावीचा विद्यार्थी कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. तो परत आला नाही म्हणून मुख्याध्यापक सुनील विठ्ठल जाधव यांनी शुक्रवारी (दि.13) त्र्यंबक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
मात्र, रविवारी (दि. 15) दुपारी शाळेमागे सुमारे दोन किमी अंतरावर असलेल्या डोंगरावरील झाडीत गुरे चारण्यासाठी गेलेल्या मुलांना झाडावर संजयचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी आश्रमशाळेत कळवले. याबाबत त्र्यंबक पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अशोक बोडके आणि कर्मचारी यांचे पथक घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करताना सायंकाळ झाली होती. त्याच्या आई-वडिलांना बोलावून घेण्यात आले आहे. मृत संजय याचा 12 मार्चला वाढदिवस होता. शाळेत दाखल जन्मतारीख 12 मार्च 2009 आहे. यावरून तो वाढदिवसाच्या दिवशी आश्रमशाळेतून निघून गेला आहे. यावरून त्याच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. याबाबत त्याच्याजवळ काही आढळले आहे का? याचा तपास होत आहे.
मृत संजय नडगे काही वर्षांपासून या आश्रमशाळेत निवासी विद्यार्थी होता. त्याचे दोन भाऊदेखील त्याच शाळेत शिक्षण घेत असल्याचे समजते. तो त्र्यंबक तालुक्यातील गुजरात सीमेवर असलेल्या बुरूडपाडा गावातील आहे. त्याचे आई-वडील मोलमजुरी करतात. रोजंदारी करण्यासाठी स्थलांतरित होत असल्याने त्याला आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी ठेवले होते. तो बेपत्ता झाल्यापासून त्याचा शोध त्याचे आई-वडीलदेखील घेत होते. शाळेतील विद्यार्थी पाठीमागे असलेल्या डोंगरावरील झाडीत अभ्यासाला जात असायची अशी चर्चा आहे. विद्यार्थी शाळा सोडून बाहेर जात असेल तर त्याबाबत नोंद ठेवावी लागते, तशी नोंद ठेवली होती की नाही, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे. मृत संजयच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. याबाबत सखोल तपासणीची मागणी
होत आहे.
आश्रमशाळेत गोरगरीब जनतेची मुले अपरिहार्यता म्हणून शिक्षण घेतात. शासन त्यांच्याबाबत बेफिकीर असल्याचे वारंवार होणार्या घटनांनी दाखवून दिले आहे. गरिबांच्या पुढच्या पिढीबाबत असे नेहमीच घडणार असेल
तर याबाबत तीव्र संघर्ष उभा राहील, याची दखल शासनाने घ्यावी अन् तातडीने सुधारणा कराव्यात.
– भगवान मधे,
संस्थापक अध्यक्ष,
एल्गार कष्टकरी संघटना
Student commits suicide at Pimpri Ashram School