डिजिटल लाटेवर स्वार होताना…

21 व्या शतकात मोबाइल आणि सोशल मीडियाने मानवी जीवन सुलभ केले असून, जग जवळ आणले आहे, हे निश्चितपणे नाकारता येणार नाही. आजचे युग हे खर्‍या अर्थाने माहितीचे युग आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून माहितीचा प्रचंड स्फोट झाला आहे, ज्यामुळे ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. सोशल मीडिया, यूट्यूब आणि ब्लॉग्स यांसारखी साधने संवादाची प्रभावी माध्यमे बनली असून, त्यांनी मानवी प्रगतीला एक नवी गती दिली आहे. तंत्रज्ञानाच्या या क्रांतीमुळे अनेक अशक्य गोष्टी आता सहज शक्य झाल्या असून, जीवनशैली अधिक प्रगत आणि वेगवान झाली आहे.
मात्र, याच क्रांतीचा अतिरेक आज समाजाला, विशेषतः कोवळ्या मुलांना आणि तरुणांना एका वेगळ्याच आणि घातक दिशेने नेत आहे. बारकाईने पाहिले तर हा काळ माहितीपेक्षा अधिक ‘भ्रमाचा’ काळ बनला आहे. हे संकट केवळ तांत्रिक नसून, ते आता मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे गंभीर रूप धारण करत आहे. आजचा मोबाइल हा केवळ संवादाचे साधन राहिलेला नाही, तर तो लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला आहे. सोशल मीडिया, रील्स आणि गेम्समुळे युवकांच्या वर्तनात झपाट्याने बदल होत आहेत. एक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार, भारतात युवकांमधील स्क्रीन अ‍ॅडिक्शन ही एक ‘सायलेंट क्रायसिस’ म्हणजेच शांत पण गंभीर समस्या बनत चालली आहे. ही व्यसनाधीनता हळूहळू वाढते आहे आणि लक्षात येईपर्यंत ती जीवनशैलीचा एक अविभाज्य पण चिंताजनक भाग बनलेली असते.
परंतु, याच नाण्याचे दुसरे सकारात्मक अंगही तितकेच प्रभावी आहे. मोबाइल आणि इंटरनेटने शिक्षणाचे लोकशाहीकरण केले आहे. आज खेड्यापाड्यातील सामान्य घरातील तरुण ‘यूट्यूब’ किंवा ‘कोर्सेरा’सारख्या प्लॅटफॉर्मवरून जगातील सर्वोत्तम विद्यापीठांचे ज्ञान विनामूल्य मिळवत आहे. लॉकडाउनच्या काळात शिक्षण सुरू ठेवण्यापासून ते आज घरबसल्या ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे परदेशी कंपन्यांमध्ये काम करण्यापर्यंतच्या संधी केवळ या डिजिटल क्रांतीमुळेच शक्य झाल्या आहेत. मोबाइल हे केवळ करमणुकीचे नाही, तर प्रगतीचे आणि सक्षमीकरणाचे एक शस्त्र ठरले आहे.
सुरुवातीला मोबाइल हे केवळ संवादाचे साधन होते, नंतर तो माहितीचा स्रोत बनला. पण आज दुर्दैवाने तो करमणूक, पैसा, ओळख आणि सामाजिक प्रतिष्ठेचा खोटा मापदंड बनला आहे. गरजेपासून सुरू झालेला हा प्रवास सवय आणि व्यसनापर्यंत कधी पोहोचला, हे आपल्याला कळलेच नाही. आजचा तरुण किंवा लहान मूल मोबाइलशिवाय काही मिनिटेही स्थिर राहू शकत नाही. नेटवर्क नसले किंवा बॅटरी संपली तर त्यांच्यात अस्वस्थता, चिडचिड आणि आक्रमकता दिसून येते. आपण याला ‘सवय’ म्हणतो, पण वैद्यकीय भाषेत हे एक गंभीर ‘डिजिटल व्यसन’ आहे. परंतु ही वास्तवता नाकारणारी एक पिढीही तयार झाली आहे; तुम्ही जुन्या जमान्यातील लोक आहात, तुम्हाला काय कळते? अशी उत्तरे पालकांना मिळतात.
लहान मुलांवर तर याचा अदृश्य आघात होत आहे. मुलांचा मेंदू हा ओल्या मातीसारखा असतो, त्यावर जे पडते ते कायमचे कोरले जाते. अशा वेळी रील्सचा भडिमार आणि यूट्यूब शॉर्ट्स तासन्तास पाहणारी मुले अभ्यासात मागे पडू लागतात. सतत स्क्रीनवर तयार इमेजेस, कार्टून्स आणि गेम्स पाहिल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीचा र्‍हास होत असून, त्यांची स्वतः विचार करण्याची क्षमता संपत चालली आहे. त्यांना ‘बोअर’ होणे मुळीच सहन होत नाही, त्यामुळे त्यांची नवनिर्मितीची प्रक्रिया थांबली आहे. अतिप्रमाणात मोबाइल वापरामुळे मुलांची एकाग्रता कमी होत असून, अभ्यासात मन न लागणे, पुस्तक वाचण्याची सवय मोडणे आणि सातत्याने स्क्रीन बदलण्याच्या सवयीमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. सतत बदलणारे व्हिडिओ आणि शॉर्ट कंटेंट मेंदूला ‘तत्काळ आनंद’ देतात, पण दीर्घकालीन विचारशक्ती आणि संयम नष्ट करतात.
दुसरीकडे, तंत्रज्ञानाचा विधायक वापर करणार्‍या मुलांमध्ये कमालीची तल्लख बुद्धिमत्ताही दिसून येते. कोडिंग शिकणे, नवीन भाषा आत्मसात करणे, ग्राफिक डिझाइन किंवा डिजिटल आर्ट यांसारखी आधुनिक कौशल्ये मुले स्वतःहून शिकत आहेत. मोबाइलमुळे आज प्रत्येकाच्या हातात एक लायब्ररी आली आहे. गुगल मॅप्सपासून ते ऑनलाइन बँकिंगपर्यंत आणि आरोग्यविषयक सल्ल्यांपासून ते आपत्कालीन मदतीपर्यंत, मोबाइलने माणसाचे आयुष्य अधिक सुरक्षित आणि वेगवान केले आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी क्राउडफंडिंगद्वारे मदत जमा करणे किंवा सामाजिक चळवळींना बळ देणे यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम ठरले आहे.
पालकही अनेकदा मुले रडू नयेत किंवा त्यांनी त्रास देऊ नये म्हणून स्वतःच त्यांच्या हातात मोबाइल देतात. हा ‘डिजिटल नार्कोटिक्स’चा डोस मुलांना तात्पुरते शांत करतो खरा, पण त्याची किंमत त्यांच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाने मोजावी लागते. यामुळे मुलांमध्ये वाचा दोष, ऑटिझमची लक्षणे आणि एकाकीपणा वाढत आहे. आता सोशल मीडिया यात अधिक भर घालत आहे. इन्स्टाग्रामवर मिळालेले ‘लाइक्स’ पाहण्यासाठी मुले आतुरलेली असतात. ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स बनवून त्वरित यशाचा आणि पैशांचा जीवघेणा भ्रम त्यांनी बाळगलेला आहे. रातोरात करोडपती होण्याचे स्वप्न विकले जात असल्याने कष्टाविना यशाची भुरळ तरुणांना पडली आहे. यामागील अपार मेहनत, संयम आणि संघर्ष जाणीवपूर्वक लपवला जातो. रील्सच्या पलीकडे अनेक करिअर्स आपल्याला पैसा, प्रसिद्धी आणि समाधान देऊ शकतात, हे सांगण्याचे काम पालकांनी थांबवले आहे. उलट, काही पालक तर मुलांना स्वतंत्र खोली, लाइट्स, महागडे मोबाइल आणि लॅपटॉप घेऊन देऊन तू रील्स बनव म्हणून प्रोत्साहन देतात. यातून शिक्षण घेण्याची गरज नाही, कष्टाची नोकरी कशाला करायची? किंवा शॉर्टकटने यश मिळते अशी समाजविघातक मानसिकता रुजत चालली आहे.
यामुळे दर्जाहीन कंटेंटची निर्मिती सुरू झाली असून, संस्कृतीचा र्‍हास होत आहे. आजकालचे दर्जाहीन ‘इन्फ्लुएन्सर्स’ तरुणांचे रोल मॉडेल बनले आहेत, ज्यांच्या कंटेंटमध्ये शिव्या देणे, अश्लील शब्दप्रयोग करणे आणि यालाच ‘विनोद’ किंवा ‘स्टाईल’ मानणे सुरू आहे. कोणताही वैचारिक आशय नसतानाही लाखो तरुण त्यांना फॉलो करतात. हे इन्फ्लुएन्सर्स ऐषारामाचा दिखावा करतात, काय खावे, कुठे फिरावे आणि कोणते उंची कपडे घालावे याचे प्रदर्शन म्हणजेच ‘व्लॉगिंग’ झाले आहे. यातून सुसंस्कृत भाषा लोप पावून ‘टपोरी’ भाषा वापरणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. आज ए.आय. आणि अल्गोरिदमचे युग आहे. तुमची आवड एकदा या माध्यमांना कळली की ‘बंबार्डींग’ सुरू होते. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तरुणांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून त्यांना जे आवडते किंवा ज्यामुळे ते उत्तेजित होतात, तेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा दाखवते. यामुळे तरुणांची विचारशक्ती कुंठीत होऊन त्यांना एकांगी विचार करण्यास भाग पाडले जाते.
अखेर, मोबाइल आणि इंटरनेट हे केवळ एक निर्जीव यंत्र नसून, ते मानवी प्रगतीचे सर्वात शक्तिशाली इंधन आहे. प्रश्न तंत्रज्ञानाचा नाही, तर आपल्या ‘विवेकबुद्धीचा’ आहे. आपण या डिजिटल लाटेत वाहून जायचे की तिचा वापर करून प्रगतीचे शिखर गाठायचे, हे पूर्णतः आपल्या हातात आहे. यावर सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे ‘डिजिटल बॅलन्स’. पालकांनी मुलांवर केवळ निर्बंध न लादता, त्यांच्यासोबत विश्वासाचे नाते निर्माण करून त्यांना माहिती आणि मनोरंजनातील फरक समजून सांगायला हवा. जेव्हा आपण मोबाइलचा वापर स्वतःला समृद्ध करण्यासाठी, नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आणि समाजाचे भले करण्यासाठी करू, तेव्हाच ही डिजिटल क्रांती खर्‍या अर्थाने यशस्वी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *