खोदकाम…नाशिककर जॅम!

नाशिक : अश्विनी पांडे
शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतूक व्यवस्था अक्षरशः विस्कळीत झाली आहे. नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते रुंदीकरण, डांबरीकरण, गॅस पाइपलाइन, भुयारी गटार योजना, तसेच सीसीटीव्ही ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याची कामे सुरू आहेत. मात्र, ही सर्व कामे एकाच वेळी विविध भागांत सुरू असल्याने शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. परिणामी नाशिककरांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरभर वाहतूक कोंडीचा कहर
रस्त्यांवर धुळवड; नागरिकांची परवड
रस्ते बंद, काम चालूमुळे जीव मेटाकुटीला

इंधन व वेळेचा अपव्यय

वाहतूक कोंडीमुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नाही, तर इंधनाचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. अनेक वाहनधारकांना रोजच्या प्रवासात अतिरिक्त वेळ खर्च करावा लागत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या कामकाजावर होत आहे. विशेषतः नोकरी करणार्‍या नागरिकांना वेळेत कार्यालयात पोहोचणे कठीण होत आहे.

आधी रस्ते नीट करा, मग दंड वसूल करा!

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील सुमारे 40 सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. नियम मोडणार्‍यांकडून ऑनलाइन दंडही वसूल करण्यात येत आहे. मात्र, रस्त्यांची अवस्था खराब असताना दंड आकारला जात असल्याने वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आधी रस्ते नीट करा, मग दंड वसूल करा, अशी भूमिका अनेक वाहनधारकांनी घेतली आहे. यामुळे काही ठिकाणी वाहनधारक व वाहतूक पोलीस यांच्यात वादाचे प्रसंगही घडत असल्याचे समोर आले आहे.

या प्रमुख रस्त्यांवर काम सुरू

शहरातील द्वारका सर्कल, त्र्यंबक रोड, गंगापूर रोड, बारधान फाटा ते सातपूर लिंक रोड तसेच मुंबई-आग्रा महामार्ग या प्रमुख मार्गांवर विविध कामे सुरू आहेत. गंगापूर रोडवर जिहान सर्कल ते आनंदवली दरम्यान एका लेनचे काम सुरू आहे. सोमेश्वर परिसरातही रस्त्याची कामे सुरू आहेत. गरवारे ते एक्स्लो पॉइंट या दिशेने येणार्‍या मार्गावरही रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय शरणपूर पोलीस चौकी ते जुना गंगापूर नाका या मार्गावरील एका बाजूचे काम सुरू असल्याने त्या रस्त्यावर वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहनांची गर्दी वाढत असून, वाहतूक कोंडी अधिकच तीव्र होत आहे. या प्रमुख रस्त्यांव्यतिरिक्त शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांवरही कामे सुरू आहेत. रस्ते रुंदीकरण, डांबरीकरण, गॅस पाइपलाइन, तसेच भुयारी गटार योजना या विविध कामांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

आरोग्याच्या समस्यांत वाढ
रस्त्यासाठी खोदकाम केल्यानंतर त्या रस्त्यांचे त्वरित डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही रस्ते अक्षरशः मातीचे झाले आहेत. वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण होते. या धुळीमुळे नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास, डोळ्यांची जळजळ, तसेच अन्य आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. रस्त्यांवरील खड्डे व उखडलेले डांबर यामुळे वाहन चालवताना मोठ्या प्रमाणावर धक्के बसतात. त्यामुळे वाहनधारकांना मणक्याच्या, तसेच पाठीच्या आजारांचा त्रास वाढत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

अपघातांच्या प्रमाणात वाढ

रस्त्यांच्या कामांमुळे अनेक ठिकाणी खडी व मातीचे ढिगारे रस्त्यालगत टाकण्यात आले आहेत. ही खडी व माती वाहतुकीमुळे रस्त्यावर पसरत असल्याने वाहन घसरण्याच्या घटना वाढत आहेत. परिणामी लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे दिसतेे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

वाहनांचे पार्ट खिळखिळे

खराब रस्त्यांमुळे वाहनांचे पार्ट वारंवार खराब होत आहेत. वाहनदुरुस्तीवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. परिणामी वाहनधारकांना आर्थिक फटका बसतोय.

वेतन कपातीचे संकट

एमआयडीसी भागातील वाहतूक कोंडीचा परिणाम तेथील कर्मचार्‍यांवरही होत आहे. सकाळी वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचार्‍यांना कामावर वेळेत पोहोचता येत नाही. औद्योगिक कंपन्यांत बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली असल्यामुळे उशिरा पोहोचल्यास त्याची नोंद होते आणि महिनाअखेरीस वेतनातून कपात केली जाते. त्यामुळे अनेक कर्मचारी नाराजी व्यक्त करीत आहेत.

आम्ही वाहने विकायची का?

विशेषतः एमआयडीसी परिसराशी संलग्न असलेल्या रस्त्यांवर सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीचे रौद्ररूप दिसतेे. कामावर जाणारे कर्मचारी, औद्योगिक वाहतूक तसेच शालेय बस यामुळे या भागातील रस्त्यांवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या वेळेत वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक्स्लो पॉइंटवरून गरवारेकडे जाण्यासाठी सकाळी व सायंकाळी तब्बल एक तास लागतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वाहनधारक संतप्त झाले असून, आम्ही वाहने विकायची का, असा सवालही काही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकाच वेळी कामामुळे नाराजीचा सूर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात विकासकामे होत आहेत, ही निश्चितच सकारात्मक बाब असल्याचे नागरिक मान्य करतात. मात्र, ती एकाच वेळी सर्वत्र सुरू असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जर ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली असती तर वाहतूक कोंडीचा त्रास काही प्रमाणात कमी झाला असता, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

सध्या शहरातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर खोदकाम सुरू आहे. काही ठिकाणी रस्ते रुंदीकरणाचे, तर काही ठिकाणी भुयारी गटार व गॅस पाइपलाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. या सर्व कामांमुळे रस्त्यांची एक बाजू बंद ठेवण्यात आली आहे किंवा वाहतुकीसाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहनांची मोठी रांग लागते. अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याचे चित्र दिसतेे.

Digging…Nashikkar Jam!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *