मनपा घरकुल योजनेतील अतिक्रमण हटविले

सिडको : विशेष प्रतिनिधी

इंदिरानगर विभागातील वडाळा परिसरात महापालिकेच्या घरकुल योजनेतील अतिक्रमणांवर महापालिका अतिक्रमण विभागाने कारवाई करत संबंधित जागा मोकळी केली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घरकुल योजनेंंतर्गत असलेल्या या परिसरात काही ठिकाणी अनधिकृतपणे किराणा दुकाने, भंगाराचे गाळे तसेच बकर्‍यांचे शेड उभारण्यात आले होते. यामुळे परिसराचे स्वरूप बकाल झाले होते. रहिवाशांना त्यांच्या दुचाकी उभ्या करण्यासाठीदेखील जागा उपलब्ध राहत नव्हती. परिणामी नागरिकांना दैनंदिन हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.
या अतिक्रमणांविरोधात स्थानिक नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत संबंधित जागेवरील सर्व अनधिकृत बांधकामे हटवली. यानंतर परिसर मोकळा झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला. परिसरात स्वच्छता आणि सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे.
अतिक्रमण हटवल्यानंतर घरकुल योजनेतील रहिवाशांनी महापालिका अतिक्रमण विभाग तसेच नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले.
नागरिकांनी पुढील काळात अशा प्रकारचे अतिक्रमण होऊ नये यासाठीही प्रशासनाने लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Encroachments in Municipal Housing Scheme removed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *