एमएनजीएलची लिंक येताच पावणेपाच लाख गायब!

पंचवटीतील शिक्षकाला गॅस बिलाच्या नावे गंडा

पंचवटी : प्रतिनिधी
शहरात सायबर भामट्यांचा सुळसुळाट झाला असतानाच आता गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने एका शिक्षकाची तब्बल 4 लाख 85 हजार 998 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीविरुद्ध फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी परिसरातील देवेंद्र हाइटमध्ये राहणारे शिक्षक अनिल पुंजाराम शेवाळे (वय 56) यांना 26 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास एक कॉल आणि मेसेज आला. तुमचे 5,905 रुपयांचे गॅस बिल थकीत आहे. ते भरा, अन्यथा पुरवठा खंडित होईल, अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांना ’चछॠङ ॠरी इळश्रश्र णविरींश’ नावाची एक लिंक पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.

लिंक डाउनलोड करताच खाते रिकामे

फिर्यादी शेवाळे यांनी विश्वास ठेवून संबंधित लिंक डाउनलोड केली. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा मिळवत, त्यांच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने 4 लाख 85 हजार 998 रुपये लंपास केले. खात्यातून पैसे वळते झाल्याचे मेसेज आल्यानंतर आपल्याला गंडा घातल्याचे शेवाळे यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर अनिल शेवाळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पवार यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

As soon as the MNGL link came, Rs. 4.75 lakh disappeared!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *