युद्ध आमुचे सुरू…

इराणविरुद्धचे युद्ध थांबविण्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत देऊन जगाला दिलासा दिला होता. त्यांच्या विधानांनी शेअर बाजारांत तेजी आली होती, सोन्या-चांदीचे दर घसरू लागले होते, खनिज तेलाचे दरही खाली यायला लागले होते. एकूणच सकारात्मक वातावरण तयार होत असताना युद्ध गुंडाळून टाकले जाईल, अशी अपेक्षाही ट्रम्प यांच्याकडून होती. युद्ध आणि युद्धाचे परिणाम यावरून अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात प्रचंड निदर्शने झाली. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर युरोपीय देश व इतर देशांतही निदर्शने झाली. दरम्यान, युद्धामुळे अमेरिकेत ट्रम्प यांची लोकप्रियता घसरत चालली असल्याचे सर्वेक्षणातून मांडण्यात येत होते. या सर्व पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून भाषण करताना युद्ध थांबविण्याची घोषणा ट्रम्प करतील, अशी अपेक्षा होती. त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते; परंतु ट्रम्प यांनी युद्ध थांबणार नसल्याचे थेट सांगितले नाही, पण आणखी दोन-तीन आठवडे युद्ध सुरू राहील, असे त्यांनी सांगून टाकले. त्यामुळे इंधनटंचाईने गॅसच्या टंचाईने हैराण झालेल्या देशांची निराशा झाली. युद्ध लवकरच संपवू, हाच अल्पसा दिलासा त्यांनी दिला. इराणमधील आमची धोरणात्मक उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, अमेरिकन सैन्य लवकरच हे काम फत्ते करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 20 मिनिटांच्या भाषणात त्यांनी अमेरिकन लष्करी कारवायांच्या यशाचा पाढा वाचला. युद्ध सुरू झाल्यापासून ते दररोज यशाचे पाढे वाचत आहेत. मात्र, त्यांनी इराणला कडक इशाराही दिला. ‘येत्या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर अत्यंत भीषण हल्ले करणार आहोत. आम्ही त्यांना पुन्हा अश्मयुगात नेऊन सोडू, जिथे राहण्यास ते पात्र आहेत,’ असे प्रक्षोभक विधान त्यांनी केले. युद्धाच्या दोन दिवसांत म्हणजे 1 एप्रिलपर्यंत प्रचंड विजय मिळविल्याचा दावा करत मोहिमेच्या विजयासाठी अधिक वेळ त्यांनी अमेरिकन लोकांकडे मागितला. यावरून युद्ध लगेच थांबणार नाही, असे त्यांनी ध्वनित केले. इराणने हॉर्मझ सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यावर बोलताना ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना आणि तेलावर अवलंबून असलेल्या देशांना स्वतःहून पुढाकार घेऊन हा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले. दक्षिण कोरिया, जपान आणि चीन यांनी स्वतःची गरज ओळखून या भागात सुरक्षा पुरवावी, असे ते म्हणाले. सामुद्रधुनी खुली करण्यासाठी युद्धनौका तैनात करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच काही देशांना विनंती केली होती; परंतु ब्रिटनसह अनेक देशांनी ट्रम्प यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तुमचे तुम्ही पाहून घ्या, असे म्हणत ट्रम्प यांनी हात वर करून काही देशांना अलीकडेच सुनावले. मुळात इराण युद्धात आपल्याबरोबर आणखी काही देशांना खेचण्याची ट्रम्प यांचा मनसुबा होता, तो यशस्वी झाला नाही. म्हणूनच त्यांनी ‘तुमचे तुम्ही पाहून घ्या’, असे वक्तव्य केल्याचे दिसून येते. “आमची लक्ष्ये साध्य करण्यासाठी आम्ही आमची मोहीम सुरूच ठेवू. लवकरच आमची सर्व उद्दिष्टे साध्य करण्याच्या मार्गावर अमेरिका आहे,” असे त्यांनी म्हटले. तसेच ‘पुढील दोन ते तीन आठवड्यांत आम्ही त्यांच्यावर खूप जोरदार हल्ला करणार आहोत. आम्ही त्यांना पुन्हा अश्मयुगात घेऊन जाऊ, जिथे त्यांचे खरे स्थान आहे,’ असेही त्यांनी यावेळी म्हटले. युद्ध सुरू होऊन महिना उलटला असला, तरी अमेरिकेला आपली उद्दिष्टे साध्य करता आलेली नाहीत. ‘ऑपरेशन फ्युरी’ सुरूच राहील. ते म्हणाले,“गुरुवारी संध्याकाळी बोलत असताना, अमेरिकेच्या लष्कराच्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ला सुरुवात होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. गेल्या चार आठवड्यांत, आमच्या सैन्याने रणांगणावर निर्णायक आणि जबरदस्त विजय मिळवला आहे. असा विजय जो यापूर्वी फार कमी लोकांनी पाहिला असेल,” असे विधान ट्रम्प यांनी केले असले, तरी अमेरिकेचा संपूर्ण विजय झालेला नाही. युद्धविराम करार करण्यासाठी इराणवर ट्रम्प दबाव टाकत आहेत. जर कोणताही करार झाला नाही, तर त्यांच्या (इराणच्या) वीजप्रकल्पांवर हल्ला केला जाईल. ट्रम्प म्हणाले, “जर ते तडजोड करण्यास तयार नसतील, तर आम्ही त्यांच्या सर्व वीजनिर्मिती प्रकल्पांवर, शक्यतो एकाच वेळी मोठा हल्ला करू,” असे विधान त्यांनी केले. यापूर्वीच ट्रम्प असेच अनेकदा म्हणाले आहेत. सत्तापालटाच्या उद्देशाने इराणवर हल्ला केला नव्हता, तर त्यांच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर सत्तांतर झाले, असा दावा त्यांनी केला. अयातुल्ला अली खामेनी युद्धात मरण पावल्यानंतरही इराणने माघार घेतलेली नाही. उलट अमेरिका आणि अमेरिकेचे मित्र असलेल्या आखाती देशांना इराण धमक्या देत आहे. याशिवाय सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, बहारिन अशा काही देशांतील अमेरिकन लष्करी तळांना आणि कंपन्यांना इराणकडून लक्ष्य केले जात आहे. इराणचे नौदल नष्ट झाले आहे, त्यांचे हवाईदल उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यांचे बहुतेक सर्वोच्च नेते आता मरण पावले आहेत. “इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सवरील त्यांचे नियंत्रण आणि कमांड पूर्णपणे नष्ट होत आहे. युद्धाच्या इतिहासात यापूर्वी कधीही कोणत्याही शत्रूला केवळ काही आठवड्यांत इतके अचूक आणि मोठे नुकसान सोसावे लागले नाही,” असा दावा ट्रम्प यांनी केला असला, तरी युद्धात इराण महिनाभर तग धरून राहिला आहे याकडे दुर्लक्ष करून चालता येत नाही. पुढील दोन ते तीन आठवड्यांत आम्ही खूप जोरदार हल्ला करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिल्याचा अर्थ म्हणजे युद्ध आणखी 15 ते 21 दिवस चालणार आहे. जमिनीवरील हल्ला करण्याबाबत ट्रम्प यांनी कोणतेही भाष्य केले नाही. जमिनीवरील कारवाई केली तर अमेरिकन सैनिकांच्या शवपेट्या त्यांना (अमेरिका) घेऊन जाव्या लागतील, असे इराणने आधीच म्हटलेले आहे. ट्रम्प यांनी आधी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना दिलेल्या मुलाखतीत जे जे दावे केले होते त्या सर्व दाव्यांची उजळणी त्यांनी भाषणात केली. अमेरिकेचे मिशन पूर्ण झाले की नाही? इराणचा अणुकार्यक्रम संपला की नाही? अशा काही प्रश्नांची उत्तरे भाषणातून मिळाली नाही. युद्धात अमेरिकेचा विजय झाला, असा दावा त्यांनी केला, तरी युद्ध सुरू राहणार, हेही त्यानी सांगितले. हा एक मोठा विरोधाभास आहे. जिंकलो तरी युद्ध आमुचे सुरू राहणार, हेच ट्रम्प यांनी अमेरिकी लोकांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी ट्रम्प यांचे दावा फेटाळत, हे युद्ध अमेरिकन जनतेच्या हिताचे नसल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी मात्र 32 दिवसांत प्रचंड विजय मिळविल्याचा दावा करत मोहिमेच्या विजयासाठी
अधिक वेळ मागितल्याने युद्ध लगेच थांबणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

The war is upon us…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *