सातपूर खंडणी प्रकरणाला वेगळे वळण
फिर्यादीविरुद्धच लैंगिक शोषणाची फिर्याद
सिडको : प्रतिनिधी
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण सुरु असतानांच पुन्हा नाशिक शहरातील सातपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर अश्लील फोटो व व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील फिर्यादीवरच आता लैंगिक शोषण तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात २ एप्रिल रोजी एका ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक आरोपींकडून चार मोबाईल, दोन पेनड्राइव्ह आणि एक मेमरी कार्ड जप्त करण्यात आले होते त्याची पोलिसांनी पडताळणी केली असता फिर्यादीच्या विविध महिला मैत्रिणींचे अश्लील व्हिडिओ चित्रण आढळून आले असून एकूण १२१ व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. या सर्व सामग्रीची पोलीसांकडुन पुढील तपासणी सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी रविंद्र गणपत एरंडे (वय ६३, रा. ३७ निलकंठेश्वर नगर ,अशोक नगर सातपूर, नाशिक) याच्या विरोधात पीडित महिलेने गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एरंडे याने तिचा गैरफायदा घेतला. ती अनुसूचित जातीची असल्याची माहिती असूनही तिला नाशिक व इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ६९, ७७, आयटी अॅक्ट कलम ६७ (अ) तसेच अॅट्रॉसिटी कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रविंद्र एरंडे याला सातपुर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे.
तपासात आरोपीने विविध महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ चित्रण केल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी नागरिकांना तसेच संभाव्य पीडित महिलांना आवाहन केले आहे की, आरोपीविरुद्ध कोणतीही तक्रार असल्यास पुढे यावे. तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.